रस्ते, उद्याने आणि कलादालनाच्या उभारणीचा प्रस्ताव

ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आजवर अनेक सुविधांना वंचित राहिलेल्या कोपरी भागाकडे आता पालिकेने मोर्चा वळवला आहे. कोपरीतील १२ रस्त्यांचे ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’(यूटीडब्ल्यूटी) या तंत्राने नूतनीकरण करण्यासोबत परिसरातील चार उद्यानांचे सुशोभीकरण, खेळाच्या मैदानाचा विकास आणि कलादालनाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या सर्व कामांचा एकत्रित प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याची अमलबजावणी झाल्यास कोपरी भागाचा कायापालट होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाप्रमाणेच पुर्व रेल्वे स्थानक परिसरातून दररोज वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या स्थानक परिसरातून विविध कंपन्यांच्या तसेच गृहसंकुलाच्या खासगी बसची वाहतूक सुरु असते. त्यामुळे शहरातील वाहतूकीच्या दृष्टीकोनातून कोपरी परिसरातील रस्ते महत्वाचे मानले जातात. गेल्या काही वर्षांत पुर्व स्थानक परिसरातील तसेच कोपरीच्या अंतर्गत भागातील रस्ते सातत्याने नादुरुस्त होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे प्रमुख नेते असलेले एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असतानाही कोपरीच्या विकासाकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले होते. या मुद्दय़ावरून सातत्याने टीका होऊ लागल्यानंतर खुद्द शिंदे यांनीच कोपरीतील रस्त्यांचे ‘यूटीडब्ल्यूटी’ पद्धतीने नूतनीकरण करण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार पालिकेने या रस्त्यांच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर कोपरी परिसरातील चार उद्यानाचे सुशोभिकरण, खेळाचे मैदान विकसित करणे आणि कलादालनाच्या नुतनीकरणाचेही काम करण्यात येणार आहे. या कामासाठी प्रशासनाने एकत्रित प्रस्ताव तयार केला असून या कामासाठी १९ कोटी ९९ लाख ९३ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

उद्यान आणि कलादालन..

मो.दा. जोशी उद्यान, सर्वोदय उद्यान, दत्ताजी साळवी उद्यान या उद्यानांच्या सुशोभिकरणासह ठाणे पुर्वेतील विविध उद्यानांमध्ये आसन व्यवस्था, खेळाचे साहित्य आणि व्यायाम शाळेची साहित्य बसविण्यात येणार आहेत. तसेच पुर्वेतील गांधीनगर येथील खेळाचे मैदान विकसित करण्याबरोबरच येथील पुलाचेही नुतनीकरण करण्यात येणार आहे.

हे रस्ते चकाचक होणार

श्रीकृष्ण मंदीर ते कोपरी भाजी मार्केट, नारायण कोळी चौक सिडको रेल्वे स्थानक, श्री मॉ स्कूल ते वनभवन, पारशेवाडी सिंधी शाळा ते हनुमान मंदीर-गंगोत्री सोसायटीपर्यंत, कमलेश सोसायटी ते एम.जी.पी कार्यालय, पै गल्ली, ठाणे पुर्व बस स्थानक डेपो आणि आसपासचा परिसर, चेंदणी कोळीवाडा आनंद भारती मार्ग, ढाकलीधाम कोपरीगाव ते आनंद गौरव, कोपरी गाव नानज बंगला ते शाळा क्रमांक १६, हेमुकलानी मार्क परिसर, कुंभारवाडा ते चेंदणी कोळीवाडा.

‘यूटीडब्ल्यूटी’ म्हणजे काय?

  • ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’ अर्थात ‘यूटीडब्ल्यूटी’ या तंत्रज्ञानांतर्गत रस्त्यावर ५० ते १०० मिमी जाडीचा काँक्रिटचा थर टाकला जातो. त्यामुळे रस्ते मजबूत व दिर्घकाळ टिकतात.