पश्चिम व मध्य रेल्वेवरील सर्व स्थानकांची तिकिटे उपलब्ध

उमरोळीतील रेल्वे प्रवाशांना आता अनारक्षित तिकिटासाठी पालघर किंवा बोईसरला जाण्याची गरज नाही. प्रवाशांच्या व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर आता येथे अनारक्षित (यूटीएस) तिकीट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून त्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. पश्चिम व मध्य रेल्वेवरील सर्व स्थानकांची तिकिटे उपलब्ध होणार आहे.

हे रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर तब्बल १८ वर्षांनी या प्रकारची सुविधा येथील प्रवाशांना उपलब्ध होत असून या स्थानकातील उत्पन्न वाढणार आहे.

या स्थानकामध्ये प्रथम मेमू व फलाटाच्या उभारणीनंतर ईएमयू (लोकल) गाडय़ा थांबू लागल्या. या स्थानकात सध्या फक्त उपनगरीय गाडय़ा थांबत असून त्या ठिकाणाहून कार्ड तिकिटे वितरित केली जायची. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या मध्य रेल्वेच्या निवडक स्थानकांची तिकिटे येथून मिळत असल्याने अपेक्षित ठिकाणचे तिकीट घेण्यासाठी प्रवाशांना पालघर किंवा बोईसर गाठावे लागत असे. त्याचप्रमाणे या ठिकाणाहून सिझन तिकीट वितरित होण्याची सुविधा नसल्याने या स्थानकाचे उत्पन्न मर्यादित दिसत असे.

उमरोळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी तसेच डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने या संदर्भात रेल्वे व्यवस्थापनाशी पाठपुरावा करून उमरोळी येथे अनरिझव्‍‌र्हड तिकिटिंग सिस्टम (यूटीएस) प्रणाली १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. यूटीएस तिकीट प्रणालीचे स्वागत करण्यासाठी उमरोळीच्या सरपंच रश्मी राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य प्राची प्रभाकर पाटील, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

पासही उपलब्ध

उमरोळी येथून पुढील काही दिवस पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांचे तिकीट व सिझन तिकीट (पास) उपलब्ध होणार आहेत. पंधरा दिवसांनंतर मध्य व इतर रेल्वे स्थानकांची तिकिटे येथून उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.

उमरोळी स्थानकाचा दर्जा हॉल्ट (थांबा) मधून एस.जी. ३ मध्ये बदलण्यात आल्यानंतर यूटीएस तिकीट प्रणालीकरिता आपल्या स्थानकातील उत्पन्नात वाढ होईल. या रेल्वे स्थानकाचा दर्जा उंचाविण्यास व अधिक गाडय़ांना थांबा मिळण्यास मदत होईल.

– विजय शेट्टी, अध्यक्ष, डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था.