News Flash

मद्याच्या जाहिरातींचे फलक हटवा

मीरा-भाईंदरमधील मद्यविक्री दुकानांना उत्पादन शुल्क विभागाचे आदेश

उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशानंतर दुकानांनी मद्य जाहिरातींचे फलक हटवण्यास सुरुवात केली आहे.

मीरा-भाईंदरमधील मद्यविक्री दुकानांना उत्पादन शुल्क विभागाचे आदेश

बीयर बार आणि वाइन शॉपमध्ये केवळ मद्य विक्री करण्याचीच परवानगी मिळते, मद्याची जाहिरात करण्यास त्यांना परवानगी नाही. परंतु मीरा भाईंदरमधील मद्य विक्रीची दुकाने आणि बीयर बार नियम धाब्यावर बसवून चक्क मद्य कंपन्यांची खुलेआम जाहिरात करत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्त्यांने याविरोधात आवाज उठविल्यानंतर जाहिरातींचे फलक उतरविण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.

राज्यात मद्यविक्रीस बंदी नसली तरी मद्यप्राशनाला प्रोत्साहन मिळेल असे कोणतेही कृत्य करण्यास सक्त मनाई आहे. ज्या ठिकाणी मद्यविक्री केली जाते अशा ठिकाणी ग्राहक आकर्षित होईल अशा तऱ्हेने मद्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि त्यांची उत्पादने यांची जाहिरात करायच्या नाहित, असे शासनाचेच धोरण आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात येणाऱ्या मद्यविक्रीच्या परवान्यावर देखील हे स्पष्टपणे नमूद केलेले असते.

मीरा भाईंदर शहरातील ठिकठिकाणच्या वाइन शॉपवर मद्याच्या भल्या मोठय़ा जाहिराती झळकत असल्याने वसंत माने यांनी कुतुहलापोटी या जाहिरातींच्या परवानगीबाबतची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली. त्यावेळी मद्य उत्पादन कंपन्यांच्या जाहिराती मद्यविक्रीच्या ठिकाणी तसेच आसपासच्या इमारतींवर लावण्यास मुंबई मद्य निषेध कायद्या अंतर्गत मनाई करण्यात आली असल्याचे समजले. त्यामुळे या जाहिरातींविरोधात माने यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर वाइन शॉपवरील जाहिरातींमधील केवळ मद्याच्या नावावरच काळा कागद चिकटविण्यात आला, परंतु जाहिरात फलकावरील मद्याच्या बाटल्या तसेच कंपनीचे नाव ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने तसेच ठेवण्यात आले.

माने यांनी मग उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना सुरू असलेल्या बेकायदा प्रकाराची माहिती दिली. या जाहिरातीकडे तरुण वर्ग आकर्षित होत असल्याचे त्यांनी अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून वाइन शॉपना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. जाहिरातीचे फलक तातडीने काढून टाकावेत अन्यथा नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असा इशारा उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.

पळवाटांना आळा

मद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यास परवानगी नाही. रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या आकाश फलकांवर देखील या जाहिराती करण्यास मनाई आहे. त्यामुळेच मद्य उत्पादन कंपन्यांकडून मद्यविक्रीच्या दुकानांवर जाहिराती करून पळवाट शोधण्यात येत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या नोटिसांनंतर दुकानावरील जाहिराती  हटविण्यास आता सुरुवात झाली आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या दुकानांनी मद्याच्या जाहिराती करून नियम पायदळी तुडवले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माहिती कार्यकर्ते वसंत माने यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 12:41 am

Web Title: unauthorized advertisement banners in thane
Next Stories
1 वाघोलीचं शनिमंदिर
2 कल्याण आरटीओ कार्यालयाचे रूप पालटणार
3 ‘रिंगरोड’मुळे ४५० झाडांचा बळी
Just Now!
X