पालिकेची परवानगी व शुल्क मोजावे लागणार

सार्वजनिक उत्सवांमध्ये तात्पुरत्या स्तरावर उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींचे फलक लावण्यावर ठाणे महापालिकेने बंदी आणली आहे. या ठिकाणी जाहिरातींचे फलक लावायचे असल्यास त्यासाठी आधी पालिकेची परवानगी घ्यावी लागेल व आवश्यक शुल्कही भरावे लागणार आहे.

सार्वजनिक उत्सवांसाठी पदपथ तसेच रस्त्यांवर मंडप उभारण्यावर बंदी आणताना मुंबई उच्च न्यायालयाने उत्सवांच्या आयोजनाबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. उत्सवांच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांनी आखलेल्या नियमांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते किंवा नाही हे पाहण्यासाठी न्यायालयाच्या सूचनेनुसार विविध शासकीय विभागातील वरिष्ठ  अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनेही यंदा उत्सवांच्या काळात होणाऱ्या नियमांच्या पायमल्लीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आले. नवरात्रोत्सवात टेंभी नाका तसेच आसपासच्या परिसरात रस्त्याच्या मधोमध मंडप उभारणे, वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने रोषणाईची आरास उभी करण्याचे प्रकारही यंदा दिसून आले. यासंबंधी काही सामाजिक संस्था तसेच प्रतिनिधींनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेण्याचे इशारे देताच जागे झालेल्या महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या मंडपांसंबंधीची नियमावली पुन्हा एकदा जाहीर केली आहे.

सण, उत्सवांच्या कालावधीत महापालिकेच्या परवानगीनुसार उभारण्यात येणाऱ्या मंडपांभोवती बेकायदा जाहिरातींची मोठी आरास केली जात असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळते. या जाहिरातींच्या माध्यमातून संबंधित मंडळास उत्पन्न मिळते. मात्र, अशा जाहिराती उभारण्यासंबंधी कोणतीही परवानगी घेतली जात नाही. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अशा जाहिरातींसाठी वेगळे शुल्क भरण्याची सक्ती आता मंडळांवर केली आहे. यापुढे मंडपांभोवती विनापरवानगी कोणतीही जाहिरात अथवा फलक मंडळांना उभारता येणार नाही. तसेच असे जाहिरात फलक उभारण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल, अशी सक्ती करण्यात आली आहे.