27 February 2021

News Flash

परवानगी अधिकृत, इमारती अनधिकृत

महापालिकेच्या संकेतस्थळावरूनही नागरिकांची दिशाभूल

प्रतिनिधिक छायाचित्र

महापालिकेच्या संकेतस्थळावरूनही नागरिकांची दिशाभूल

वसई : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिकांनी वसई-विरार शहरांत हजारो अनधिकृत इमारती बांधल्या आहेत. आता महापालिकेची अधिकृत बांधकाम परवानगी घेऊन अनधिकृत इमारती बांधल्या जात असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर बांधकाम परवानगी दिल्याची यादी प्रसिद्ध केल्याने संबंधित इमारत जरी अधिकृत असली तरी प्रत्यक्षात त्यात अनधिकृत वाढीव बांधकामे केली जात आहेत. ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी घरे घेण्यापूर्वी नगररचना विभागात संपर्क करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

अनधिकृत बांधकामाविरोधात महापालिकेने कंबर कसली असून नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर बांधकाम परवानगी टाकण्यात आली आहे. मात्र विकासक बांधकाम परवानगी घेऊनही वाढीव अनधिकृत बांधकामे करत असल्याचे उघड झाले आहे.

वसई-विरार शहरांत हजारो अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक झालेली आहे. बांधकाम व्यावसायिक बनावट कागदपत्रे, बनावट बांधकाम परवानग्या दाखवून ग्राहकांना इमारतीमधील घरे विकत होते. एकदा घरे विकल्यानंतर बांधकाम व्यावसायिक हात वर करून पसार होतो आणि त्या इमारतीत राहणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना अनधिकृत इमारतीचा फटका सहन करावा लागत आहे. त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही आणि परिणामी नळजोडणी मिळत नाही, तसेच शास्तीचा भुर्दंडही भरावा लागत आहे.

हा प्रकार रोखण्यासाठी महापालिकेने बांधकाम परवानगी (सीसी) मिळालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. वसई शहरात घरे घेण्यापूर्वी नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळाला भेट देऊन संबंधित भूमापन क्रमांक असलेल्या गृहप्रकल्पाला बांधकाम परवानगी आहे की नाही, हे तपासून घेता यावे. मात्र आता अनेक प्रकरणांत महापालिकेने बांधकाम परवानगी देऊनही अनधिकृत बांधकामे केल्याचे उघड झाले आहे. हे बांधकाम व्यावसायिक पालिकेकडून विशिष्ट मजल्यांची बांधकाम परवानगी घेतात. जर तीन मजल्यांची परवानगी असेल तर प्रत्यक्षात चार ते पाच मजले अनधिकृत बांधकाम करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रहिवाशांची मोठय़ा प्रमाणावर फसगत होऊ  लागली आहे.

‘अनधिकृत इमारती, विकासकांची नावे जाहीर करा’

सर्वसामान्य नागरिक संकेतस्थळावर पडताळणीसाठी जात नाहीत. त्यांना भूमापन क्रमांक, बांधकाम परवानगी यांची माहिती नसते. ज्यांना माहिती असते, त्यांचीही यामुळे फसगत होत असते. त्यामुळे पालिकेने अनधिकृत इमारती, त्यांचा तपशील आणि ती बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना संबंधित प्रकल्प अनधिकृत आहेत का ते सहज कळू शकणार आहे.

पालिका म्हणते, चौकशी करावी

नागरिकांनी वसई-विरार शहरांत घरे घेण्यापूर्वी संबंधित प्रकल्पाची कागदपत्रे पडताळणीसाठी नगररचना कार्यालयात भेट देऊन चौकशी करावी, असे नगररचना उपसंचालक संजय जगताप यांनी सांगितले. संकेतस्थळावर आम्ही दिलेल्या बांधकाम परवानग्या प्रसिद्ध केलेल्या आहेत; परंतु त्यातही अनधिकृत बांधकामे केली जात असल्याचे उघड झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी नगररचना विभागात संपर्क केल्यास संबंधित इमारत अनधिकृत आहे की नाही, हे तात्काळ समजेल असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 1:27 am

Web Title: unauthorized building built with vasai virar municipal corporation permission
Next Stories
1 ठाण्यात कोरम मॉलमध्ये बिबट्याचा वावर, अथक प्रयत्नानंतर जेरबंद
2 सागरकिनाऱ्याची ‘बुलेट’ सफर!
3 पारसिक बोगद्याला पुन्हा धोका?
Just Now!
X