कल्याण-डोंबिवली पालिकेची परवानगी न घेता भूमाफियांकडून बांधकाम

डोंबिवली पश्चिमेत सरकारी जमिनींवरील बेकायदा चाळी तोडून त्या ठिकाणी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानगी न घेता भूमाफियांनी बेकायदा इमारतींचे इमले उभे करण्यास सुरुवात केली आहे. वर्षभरापासून हा प्रकार मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.

‘महारेरा’ कायद्यामुळे विकासक म्हणून मिरविणाऱ्या भूमाफियांची कोंडी झाली आहे. त्यांना भूखंड घेऊन त्यावर अधिकृत इमारती उभारणे शक्य नाही. या माफियांनी आता जुन्या सरकारी जमिनींवरील चाळी तोडून तेथे पालिकेच्या बांधकाम परवानगी न घेता बेकायदा इमारती उभारल्या जात आहेत.

इमारतींमध्ये चाळीतील रहिवाशांना काही सदनिका दिल्या जातात. उर्वरित सदनिका माफिया झालेला खर्च वसूल करण्यासाठी विक्रीसाठी राखून ठेवतो. १५ लाखापासून ते ३० लाखापर्यंत या बेकायदा इमल्यात सदनिका मिळते. एका इमारतीत ५० ते ५५ सदनिका बांधल्या जातात. बनावट कागदपत्रांच्या आधारे ग्राहकाला सदनिका विकली जाते, असे या क्षेत्रातील माहितगाराने सांगितले.

चाळीच्या ठिकाणी सुरू असलेल्या काही बांधकामांना परवानगी आहे. काही बांधकामे मात्र पालिकेची परवानगी न घेताच सुरू आहेत. अशा बेकायदा  इमारतींची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे, असे ‘ह’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सांगितले.

नाल्याला खेटून..

गरीबाचापाडा, नवापाडा, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, गोपीनाथ चौक, भरत भोईर नाला, मोठागाव, रेतीबंदर, जुनी डोंबिवली भागात चाळी तोडून तेथे इमारती उभारणीचे काम  सुरू आहे. देवीचापाडय़ातील नाल्याला खेटून इमारतींचे काम सुरू आहे.

चाळीच्या जागेवर इमारतींना बांधकाम परवानगी देण्याची कोणतीही तरतूद नाही. अशा बांधकामांना नगररचना विभागाकडून आजवर परवानग्या दिलेल्या नाहीत.

-मारुती राठोड, सहाय्यक संचालक नगररचना कडोंमपा