News Flash

फेरीवाल्यांचे नालासोपारा रेल्वे स्थानकात अतिक्रमण

फेरीवाल्यांमुळे प्रवासी त्रस्त असतानाच आता फेरीवाल्यांनी स्थानकातच अतिक्रमण केले आहे.

नालासोपारा स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या फेरीवाल्यांमुळे प्रवासी त्रस्त असतानाच आता फेरीवाल्यांनी स्थानकातच अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात ये-जा करणे कठीण जात आहे. रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलांवरही फेरीवाल्यांची गर्दी होत असून त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. रेल्वे प्रशासनाने या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर फेरीवाल्यांनी बसावे, असा नियम असला तरी नालासोपाऱ्यात या नियमाचे नेहमीच उल्लंघन केले जाते. नालासोपारा फलाट क्रमांक एकवर येणाऱ्या वाटेवर फेरीवाले घोळका करून बसलेले असतात. याच ठिकाणी तिकीटघर असल्यामुळे प्रवाशांची गर्दी असते. त्यांना या फेरीवाल्यांचा त्रास होतो, अशी तक्रार करण्यात आली आहे. फेरीवाल्यांमुळे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना खूपच त्रास होत आहे. फेरीवाल्यांमुळे नीट चालताही येत नाही, असे काही प्रवाशांनी सांगितले.

नालासोपारा पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरही फेरीवाल्यांची गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी या पुलाचा प्रवाशांकडून अधिक वापर केला जातो. मात्र त्याच वेळी फेरीवाले येथे येऊन बसतात. नालासोपारा स्थानकापासून काही अंतरावर भाजीबाजार आहे. मात्र अनेक भाजीविक्रेते तिथे न बसता स्थानकातच आणि पुलावर बसत आहेत. तिकीटघराजवळच फेरीवाले बसत असल्याने त्याचा मोठा त्रास प्रवाशांना होत आहे.

रेल्वे स्थानकावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाचे आहे. मात्र रेल्वे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करीत नाही. त्यामुळे या फेरीवाल्यांचे फावते, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.

फेरीवाल्यांवर आम्ही अनेकदा कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दंडही वसूल करतो. मात्र रेल्वे प्रशासन एकटे काही करू शकत नाही. महापालिका प्रशासनानेही आम्हाला सहकार्य केले पाहिजे. रेल्वे स्थानकापासून १५० मीटपर्यंत बसण्यास फेरीवाल्यांना मनाई आहे.   – रिशी कविता, रेल्वे सुरक्षा अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 3:10 am

Web Title: unauthorized business in nalasopara
Next Stories
1 विकासकामावरून भाजप-सेना नगरसेवकांमध्ये जुंपली
2 पैंजणांमुळे महिलेच्या हत्येचे गूढ उकलले!
3 देहेर्जा प्रकल्पासाठी भूमिपुत्रांचा टाहो
Just Now!
X