News Flash

बांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर

करारपत्राच्या आधारे ठेकेदाराला कामाचे आदेश

बनावट सहीद्वारे दोन कोटींची निविदा मंजूर; करारपत्राच्या आधारे ठेकेदाराला कामाचे आदेश

पालघरमधील हुतात्मा स्तंभ ते वीर सावरकर मार्ग वळण नाका या रस्त्याच्या कामांत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. विद्यमान बांधकाम सभापती अतुल पाठक यांच्या बनावट सहीचा वापर करून या रस्त्याच्या कामांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. पालघर नगर परिषदेच्या विशेष सभेत याबाबत चर्चा झाली असून हे करारपत्र बांधकाम समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्य यांच्या सहीसाठी ठेकेदाराने चक्क बाहेर नेल्याचेही उघड झाले आहे. मात्र ही बाब समोर आल्यानंतरही विशेष सभेने कोणताही निर्णय घेतला नाही.

पालघर नगर परिषदेची विशेष सभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. हुतात्मा स्तंभ ते वीर सावरकर चौक वळण नाका रस्त्याच्या मुद्दय़ावर या सभेत एक ते दोन तास चर्चा झाली. या चर्चेत रस्त्याच्या कामांसंबंधात नगरपरिषद आणि ठेकेदारांमधील झालेल्या करारपत्राचा मुद्दा समोर आला. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून स्थायी समितीचे दोन सदस्य म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभाग सभापती अतुल पाठक आणि अन्य सदस्य उत्तम घरत यांची सही असल्याची माहिती सभेला देण्यात आली. अतुल पाठक यांनी या करारपत्रावर मी सही केली नसल्याचे स्पष्ट केले. पाठक यांनी ही माहिती दिल्यानंतर करारपत्राची मूळ प्रत सभेसमोर मागवण्यात आली आणि त्यावरील सही अतुल पाठक यांना दाखवण्यात आली. त्या वेळी ही सही माझी नसल्याचे आणि कोणी तरी माझी बनावट सही केल्याचे पाठक यांनी येथे स्पष्ट केले. यावर नगर परिषदेकडे उपलब्ध सभेच्या उपस्थितीदर्शक कागदपत्रांवरील अतुल पाठक यांची सही आणि करारपत्रांवरील सही तपासून पाहण्यात आली. या वेळी ही करारपत्रावरील सही पाठक यांच्या मूळ सहीशी मिळतीजुळती नसल्याचे आढळून आले. यावर हा सर्व प्रकार पाहून सभागृह अवाक् झाले. सभागृहाने या संदर्भात स्पष्टीकरण मागितले असता बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने स्थायी समिती सदस्यांच्या सह्या घेण्यासाठी ठेकेदाराकडे करारपत्र देण्यात आले होते, अशी माहिती दिली. त्यामुळे त्यांनी नेमका कोणाच्या सह्या घेतल्या याची कल्पना नसल्याचे या अधिकाऱ्याने सभेसमोर स्पष्ट केले. मात्र या गंभीर विषयावर सभेत पुढे कोणताही निर्णय झाला नाही.

निविदा कशासाठी?

हुतात्मा स्तंभ ते वीर सावरकर चौक वळण नाका रुंदीकरण आणि मजबुतीकरण करणे अशा या कामाची निविदा मार्चमध्ये निघाली होती. पुरेशा निविदा नसल्याचे सांगून एप्रिलमध्ये २ कोटी ८८ लाख ७९ हजार ४६५ इतक्या रकमेची फेरनिविदा काढण्यात आली. त्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे तिचे काम थांबले. पुढे ऑगस्टमध्ये ती फेरनिविदा उघडण्यात आली आणि करारपत्र केल्यानंतर सप्टेंबरला या कामाचे आदेश देण्यात आले. हा रस्ता १५ मीटर रुंद तर १८०० मीटर लांबीचा आहे.

ही सही आपण केली नसल्याचे स्वत: अतुल पाठक यांनी सभेत सांगितले आहे. याचा खुलासा नगर परिषदेने करावा. या संबंधी चौकशी आणि खुलासा करण्यासाठी मी नगरपरिषदेला पत्र देणार आहे.  – सचिन पाटील, नगरसेवक

या करारपत्रावर माझी सही नाही हे खरे आहे. यासंबंधात मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याशी बोलणार असून हे प्रकरण सदोष असेल तर पुढे त्याच्या कारवाईसाठीचा प्रस्ताव ठेवणार आहे.   – अतुल पाठक, बांधकाम सभापती, पालघर नगर परिषद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:49 am

Web Title: unauthorized construction at palghar
Next Stories
1 जव्हारचा ‘दरबारी दसरा’ उत्साहात साजरा
2 पालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक
3 बीएसयूपी योजनेचा निधी परत
Just Now!
X