विरार, नालासोपाऱ्यात इमारतींवर कारवाई

वसई विरार महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. विरार आणि नालासोपारा शहरात शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तात ही मोहीम उघडण्यात आली. या मोहिमेत शेकडो अनिधकृत गाळे, इमारती तोडण्यात येत आहेत. यामुळे भूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी नालासोपारा पूर्व येथील सर्वोदय वसाहतमधील कोहिनूर प्लाझासमोरील अनधिकृत चार मजली इमारतीवर वसई-विरार महानगरपालिकेने पेल्हार अवधूत आश्रमच्यामागील खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्या. प्रभाग समिती ‘ई’मधील अनधिकृत इमारतींच्या तिसऱ्या-चौथ्या मजल्यांचे बांधकाम तोडण्यात आले. नालासोपारा पूर्वेच्या एव्हरशाईन नगर येथील राम-रहीम इमारतीचा चौथा अनधिकृत मजला जमीनदोस्त करण्यात आला. शनिवारी सत्यम शिवम शॉपिंग सेंटर येथे चार गाळे ८०० चौरस फुटांचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. त्यावेळी जमीनमालक सिकंदर व्होरा आणि त्याच्या भावाने बांधकाम तोडण्यास अडथळा निर्माण केला. मात्र महापालिकेने विरोधाला न जुमानता बांधकाम जमीनदोस्त केले. नालासोपारा पश्चिमेच्या भूमापन क्रमांक १२३ मध्ये आरसीसीचे पक्के बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. नालासोपारा पूर्वेच्या भूमापन क्रमांक ३७ मधील अनधिकृत इमारतीचा चौथा आणि पाचवा मजला तोडण्यात आले. गासमधील भूमापन क्रमांक  ४११ हनुमान नगर येथील दोन मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, उपायुक्त किशोर गवस यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू होती. आमची ही कारवाई टप्प्याटप्प्याने सर्व शहरात सुरू राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली.

अनधिकृत चाळींची जाहिरात यू टय़ूबवर

महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरोधात कारावई सुरू असताना दुसरीकडे भूमाफियांनी आपल्या अनधिकृत चाळींची विक्री जोरात सुरू केली आहे. त्यासाठी समाजमाध्यमाचा आधार घेतला जात आहे. विरारच्या कोपरी येथील भूमाफियाने आपल्या अनधिकृत चाळींची जाहिरात यू टय़ूबवर केली आहे. पालिकेची नळ जोडणी, महावितरणाची वीजजोडणी देण्यात येईल, असा दावाही केला आहे. पालिकेने मात्र कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिले जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.