अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेल, हुक्का पार्लरना टाळे, अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाण्यातील बहुचर्चित कोठारी कम्पाऊंड तसेच शहराच्या विविध भागांतील हॉटेल, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरला अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला सादर करण्यासाठी महापालिकेने दिलेली पंधरा दिवसांची मुदत संपली असून या मुदतीनंतरही दाखले सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या हॉटेल, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरला सील ठोकण्याची कारवाई महापालिकेने सोमवारपासून सुरू केली आहे. या कारवाईमध्ये कोठारी कम्पाऊंड तसेच शहरातील हॉटेल्सची बेकायदा बांधकामेही तोडण्यात आली.

मुंबई येथील कमला मिल इमारतीमधील आगीच्या घटनेनंतर सर्वच शहरांमधील हॉटेल, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या हॉटेल, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरला नोटिसा बजावून कारवाईची तयारी केली होती. मात्र या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संबंधित आस्थापनांच्या मालकांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन काही दिवसांची मुदत मागितली होती. या मागणीनंतर आयुक्त जयस्वाल यांनी संबंधित आस्थापनांच्या मालकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देऊ  केली होती. ही मुदत शनिवारी संपल्याने आयुक्त जयस्वाल यांनी सोमवारपासून शहरात कारवाई सुरू केली आहे. त्यामध्ये पंधरा दिवसांच्या मुदतीनंतरही दाखले सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या हॉटेल, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर अशा सहा आस्थापनांना सील ठोकण्यात आले, तर दहा हॉटेल्सचे बेकायदा बांधकाम कारवाईदरम्यान जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईसाठी आयुक्त जयस्वाल हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या पथकाने ही कारवाई केली.

ठाणे महापालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कोठारी कम्पाऊंडमधील बेकायदा बांधकामाच्या कारवाईसाठी आक्रमक झालेल्या भाजपच्या काही नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली होती. या टीकेनंतर महापालिकेने सोमवारपासून अग्निशमन ना हरकत दाखला नसलेली तसेच बेकायदा बांधकामे करण्यात आलेल्या शहरातील हॉटेल्ससह कोठारी कम्पाऊंडमधील बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे.

कारवाई कुठे?

* कोठारी कम्पाऊंडमधील एमएच ४ पब आणि बार, डान्सिग बॉटल पब, लाऊंज १८ बार, व्हेअर वुई मेट, बार इन्डेक्स हे हुक्का पार्लर पालिकेने कारवाईमध्ये सील केले. या आस्थापनांचे वाढीव बांधकाम तोडण्यात आले.

* नौपाडय़ातील पुरेपूर कोल्हापूर, साईकृपा या हॉटेल्सच्या ठिकाणी करण्यात आलेले वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले, तर एक्स्पिरियन्स हा टेरेस बार पूर्णत: तोडून टाकण्यात आला.

* मल्हार सिनेमा येथील दुर्गा बार आणि रेस्टॉरंट, जांभळी नाका येथील अरुण पॅलेस बार या आस्थापनाही सील करण्यात आल्या.

* रामचंद्रनगर येथील जयेश हा लेडीज बार पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आला, तर उथळसर येथील फुकरे बारसह अन्य तीन रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली.