माफियांकरवी हफ्ता वसुली; बेकायदा फेरीवाला समिती

विरार पूर्वेच्या चंदनसार येथे फेरीवाला माफियांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर बाजार सुरू केला आहे. हे माफिया फेरीवाल्यांकडून दररोज हप्ते वसूल करत असतात. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी फेरीवाला समिती बनवली असून तीदेखील बेकायदेशीर आहे.

वसई-विरार महापालिकेचे फेरीवाला धोरण अद्याप तयार नाही. फेरीवाल्यांची संख्यानिश्चिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात फेरीवाला माफिया तयार झाले असून ते जागोजागी अनधिकृत बाजार बसवत आहे. या अनधिकृत बाजारात बसलेल्या फेरीवाल्यांकडून दररोज पैसे वसूल केले जात आहे. या आठवडी बाजाराच्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो, शिवाय मोठी वाहतूक कोंडीही होत असते. विरार पूर्वेच्या चंदनसार येथे असाच एक बाजार फेरीवाला माफियांनी बसविला असून त्यांनी जागेवर अतिक्रमण केले आहे.

हा बाजार बसविणाऱ्यांनी फेरीवाला समिती बनवली आहे, मात्र या समितीला कसलीच मान्यता नाही. त्यांनी बसवलेले फेरीवाले देखील बेकायदेशीर असून त्यांच्याकडे कोणतेही परवाने नाहीत. या फेरीवाला माफियांच्या प्रत्येकाच्या मालकीच्या आठ ते नऊ जागा आहेत. हे जागा मालक दररोज ३०० फेरीवाल्यांकडून प्रति १० रुपये अशी हप्ता वसुली करतात. त्यांना कोणतीही पावतीदेखील देत नाहीत.

गरिबांना लुटून त्यांच्याकडून हप्ता वसुली करता यावी यासाठी त्यांनी ही जागा अडवून ठेवलेली आहे, असा आरोप बहुजन समाज पक्षाचे पालघर प्रभारी प्रा. डी. एन. खरे यांनी केला आहे. त्यांनी ज्या जागेवर मालकी दावा केला आहे, त्या जागादेखील त्यांच्या नसून बनावट कागदपत्रे तयार केली आहेत, असा आरोप खरे यांनी केला आहे. चंदनसार येथील बेकायदेशीर फेरीवाले हटवावे, त्यांच्याकडून हप्ते वसूल करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी खरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

‘अनधिकृत फेरीवाले हटवणार’

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले की, आम्ही शहरातील अनधिकृत फेरीवाले हटविण्यास सुरुवात केलेली आहे. विरार स्थानकापासून मोहीम सुरू झालेली आहे.

चंदनसार येथील फेरीवाले देखील आम्ही हटवू. तिकडचे फेरीवाले हटवले तर आपोआप फेरीवाले माफिया किंवा जे कुणी हप्ते घेणारे असतील त्यांना आळा बसेल असे त्यांनी सांगितले.