खासगी वाहने उभी असल्याने बसगाडय़ांच्या वाहतुकीत अडथळे

नालासोपारा पश्चिमेला असलेले एसटी बसचे आगार बेकायदा वाहनतळ बनले आहे. या आगारात दररोज शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी असल्याने आगारात येणाऱ्या बसना अडथळे निर्माण होत आहेत. प्रवासी भरण्यासाठी रिक्षाही थेट आगारात येत असल्याचे चित्र आहे.

नालासोपारा पश्चिमेला राज्य परिवहन मंडळाचे बस आगार आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकाला लागूनच हे आगार आहे. रेल्वे स्थानकात उतरणारे हजारो प्रवासी या आगारातून ये-जा करतात. मात्र या आगारात खासगी वाहने उभी राहत आहेत. त्यामुळे एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांना त्रास होत आहेत. प्रवाशांना आगारात येण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. थांबलेल्या वाहनांच्या अडथळय़ामुळे बसचालाकांना बस वळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नो पार्किंगच्या पाटय़ा शासनाकडून लावल्या असतानाही पाटय़ांच्या समोरच वाहने उभी केली जातात. प्रवासी भरण्यासाठी रिक्षाचालक थेट आगारातच गाडय़ा उभ्या करतात.

नागरिकांची यामुळे गैरसोय होत असते. त्यांना ये-जा करण्यात अडचण निर्माण होते. या वाहनांच्या अडथळ्यांमुळे बसचालकांना बस वळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नो पार्किंगच्या पाटय़ा शासनाकडून लावल्या असतानादेखील या पाटय़ांच्या समोरच वाहने उभी केली जातात. प्रवासी भरण्यासाठी रिक्षाचालक थेट आगारातच गाडय़ा उभ्या करतात.

प्रवाशांच्या व्यथा

वाहतूक पोलिसांनी अनेकदा कारवाई करून दंड वसूल केला तरी परिस्थितीत काही बदल झालेला नाही. या आगाराच्या शेजारीच वाहनतळ बनवलेला आहे. मात्र नागरिक तेथे वाहने उभी करण्याऐवजी आगारात उभी करतात. पोलिसांनी नियमित कारवाई केली आणि दंड आकारला तर हे प्रमाण कमी होईल, असे प्रवासी सांगतात.

आगारात थांबलेल्या खासगी वाहनांच्या चालकांवर आम्ही कारवाई केली. मात्र त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा वाहने आगारात थांबलेली असतात. खासगी वाहनचालक हुज्जत घालतात, कधी कधी धक्काबुक्कीही करतात. पोलीस कारवाई करतात, मात्र त्याचा उपयोग होत नाही.

– दिनकर भोसले, आगार व्यवस्थापक