वसईत वाहनचालकांचा पालिका कर्मचाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होत असल्याच्या तक्रारी

पालिकेने वसईत लाखो रुपये खर्चून उभारलेल्या मैदानात बेकायदा वाहनतळ तयार करण्यात आला आहे. पालिका कर्मचाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण व्यवहार करून उद्यानात वाहने उभी करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. यावर पालिकेने गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील वाहने तात्पुरती उद्यानात आणल्याचा अजब युक्तिवाद केला आहे.

वसई पश्चिमेकडील आनंदनगरात पालिकेचे वीर सावरकर उद्यान आहे. यात उद्यानात मुलांसाठी विविध खेळणी बसविण्यात आली आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था आहे. काही दिवसांपासून या उद्यानात अनेक खासगी वाहने उभी केली जात आहेत.

त्यामुळे खेळण्यासाठी बनविलेल्या उद्यानाचे वाहनतळ बनविण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनेक दिवसांपासून अशा प्रकारे बेकायदा वाहने उभी केली जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

उद्यानातील वाहनतळामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रारी केल्या तरी ते दुर्लक्ष करतात असे स्थानिक रहिवाशी अमित शहा यांनी सांगितले.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर पालिकेने ही वाहने हटवली आहेत. गणपतीच्या काळात सार्वजनिक मंडळे विविध कार्यक्रम करतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहने तात्पुरत्या स्वरूपात उद्यानात ठेवलेली होती. परंतु आता ही वाहने हटविण्यात आली आहेत, असे प्रभाग समिती एचचे प्रभारी साहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्साल्विस यांनी सांगितले.