ठाणे स्थानक परिसरात बेकायदा पार्किंग सुरूच

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा वाहने उभी करण्यावर र्निबध आणण्यासाठी महापालिका, रेल्वे आणि वाहतूक पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असली तरी, पार्किंगबहाद्दर बधेनासे झाले आहेत. रेल्वे स्थानक परिसरात वाहने उभी राहू नयेत, यासाठी पार्किंग होत असलेल्या ठिकाणी संरक्षक अडथळे (बॅरिकेड) उभे करण्यात आले आहेत. मात्र, आता बेकायदा पार्किंग करणाऱ्यांनी बस स्थानकाबाहेरील जागेवर वाहने उभे करण्यास सुरुवात केली आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा वाहने तसेच फेरीवाले बसू नयेत यासाठी प्रशासनातर्फे गेल्या काही दिवसांपासून कठोर कारवाई केली जात आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानक परिसरात रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलिसांतर्फे येथे उभ्या करण्यात येणाऱ्या दुचाकींवर कडक कारवाई केली होती. या कारवाईनंतरही स्थानक परिसरात उभ्या करण्यात येत असलेल्या दुचाकींची वाट अडवण्यासाठी दुचाकींसाठी अडथळे तयार करण्यास सुरुवात केली. अडथळे उभे केल्याने स्थानक परिसरात उभ्या करण्यात येत असलेल्या दुचाकींना आळा घालता येईल अशी आशा प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात येत असतानाच दुचाकीस्वारांनी आपले बस्तान बदलले आहे. फलाट क्रमांक दोनच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर जवळच असलेल्या बस स्थानकासमोर या दुचाकी उभ्या करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली होती. याच जागेवर अनधिकृत पार्किंग करण्यात येत आहे. सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांचा लवाजमा रेल्वे स्थानकात ये-जा करत असताना या अरुंद रस्त्यावर त्यामुळे गर्दी होत असते. दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या कडक भूमीकेनंतरही काही प्रवाशी बेकायदा वाहने उभी करण्यासाठी नव्या जागांचा शोध घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या नव्या अतिक्रमणामुळे रेल्वे स्थानक परिसरात नव्याने कोंडी होऊ लागली आहे. यासंबंधी या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. फलाट दोनबाहेर पडल्यावर उजवीकडे वळणारा रस्ता अतिशय अरुंद असल्याने या ठिकाणी करण्यात येणारी दुचाकींची दुहेरी पार्किंग या रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांसाठी अडथळा ठरत आहे.