ठाणे नगर वाहतूक शाखेची रेल्वे स्थानक परिसरात धडक कारवाई

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांना गराडा घालून मनमानी भाडे आकारणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात ठाणे नगर वाहतूक शाखेतर्फे बुधवारी सकाळी कारवाई करण्यात आली. हे रिक्षाचालक घोडबंदर, कासारवडवली या भागात जाणाऱ्या प्रवाशांकडून विनामीटर मनमानी भाडे आकारत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. साधा वेशातील पोलिसांनी बुधवारी रेल्वे स्थानकाबाहेर पाळत ठेवून अशा ११ रिक्षाचालकांवर कारवाई केली. त्यामुळे स्थानक परिसरातील मुजोर रिक्षाचालकांना चाप बसला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. वागळे इस्टेट, घोडबंदर या भागात माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक कार्यालये आहेत. या ठिकाणी इतर उपनगरांतून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय ठाणे शहरात नवीन प्रवासी मोठय़ा संख्येने दाखल होत असतात. या प्रवाशांना आपल्या रिक्षाकडे घेऊन जाण्यासाठी हे रिक्षाचालक घोळक्याने फलाट क्रमांक एकच्या बाहेर उभे राहतात व प्रवाशांना साद घालतात. स्थानकाबाहेरील अधिकृत रिक्षाथांब्यावर प्रवाशांच्या रांगा लागलेल्या असतात. या रांगेत उभे राहायला लागू नये, यासाठी अनेक प्रवासी या रिक्षाचालकांच्या रिक्षांकडे वळतात. मात्र, हे रिक्षाचालक मीटरप्रमाणे न चालता मनमानी भाडे आकारतात. घोडबंदर, कासारवडवली, वागळे इस्टेट, भिवंडी या भागात जाण्यासाठी ग्राहकांकडून चारशे ते पाचशे रुपये वसूल करण्यात येत होते. याबाबत अनेकदा प्रवाशांनी तक्रारीही केल्या आहेत. याखेरीज या रिक्षाचालकांमुळे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना अडथळा येत असल्याच्याही तक्रारी येत होत्या. विशेषत: महिला प्रवाशांना घेरून त्यांना भाडय़ाविषयी विचारणा करण्याच्या रिक्षाचालकांच्या सवयीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

या पाश्र्वभूमीवर ठाणे नगर वाहतूक विभागाच्या १२ पोलीस कर्मचारी  बुधवारी रेल्वे स्थानक परिसरात साध्या गणवेशात दाखल झाले. ठाणे रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक एकजवळ रिक्षा दूर ठेवून रिक्षाचालक घोडबंदर, वागळे या भागात जाण्यासाठी ग्राहकांना आरोळी देत होते. त्यावेळी साध्या वेशातील पोलीस घोडबंदर, कासारवडवली, वागळे इस्टेट या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षात बसले आणि त्यानंतर अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. रिक्षा अन्य ठिकाणी उभी करून स्थानकाबाहेर येणाऱ्या ग्राहकांना भाडय़ासाठी आग्रह करत विनामीटर अवाजवी भाडे आकारणे हा गुन्हा असल्याने ही कारवाई केली असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात काही रिक्षाचालक हे नव्याने ठाणे शहरात येणाऱ्या नागरीकांना घोडबंदर, कासारवडवली या भागात जाण्यासाठी वाटेत अडवून आग्रह करतात आणि त्यांच्याकडून विनामीटर अधिक भाडे आकारतात, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.  – हेमलता शेरेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे नगर वाहतूक शाखा)