कल्याण, डोंबिवली शहरांचे झपाटय़ाने नागरीकरण सुरू झाल्यानंतर रिक्षांसाठी अधिकृत वाहनतळ, वाहनतळांसाठी शहरातील रस्ते निश्चित करणे आवश्यक होते. मात्र त्यासाठी ठोस प्रयत्न झाले नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून वाहतूक, ‘आरटीओ’ने येथील वाहतूक व्यवस्थेबाबत अनेक सविस्तर अहवाल महापालिकेला दिले. मात्र त्यात निविदा-टक्केवारी नसल्याने हे सर्व विकासाचे अहवाल धूळ खात पडले आहेत.

कल्याण, डोंबिवली परिसराचे आखीव नियोजन करताना नियोजनकारांनी २० वर्षांपूर्वी शहरातील वाढत्या वाहन संख्येचा विचार करून, दोन्ही शहरांच्या रेल्वे स्थानक, मध्यवर्ती ठिकाणी वाहनतळांचे आरक्षण ठेवले होते. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाला खेटून वाहनतळांची पाच आरक्षणे आहेत. कस्तुरी प्लाझा संकुलाच्या ठिकाणी एस. टी. आगाराचे आरक्षण होते. डोंबिवली पश्चिमेला सम्राट हॉटेलसमोरील इमारतीत भुयारी वाहनतळ आहे. पी. पी. चेंबर्सच्या ठिकाणी वाहनतळाचे आरक्षण होते. मात्र त्या ठिकाणी भाजी मंडई बांधायची असल्याचे दाखवत तेथे भव्य व्यापारी संकुल उभे केले आणि भुयारी वाहनतळाची जागा खासगी विकासकाच्या घशात घातली. चिमणी गल्लीत वाहनतळाचे आरक्षण होते. तेथे बाहुबली राजकीय नेत्यांच्या, पारदर्शकतेचा बुरखा पांघरून शहर हिताचा खोटा बुरखा पांघरणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या वर्चस्वामुळे भव्य संकुल उभे राहिले. कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानकालगत बोरगावकर वाडीत वाहनतळाची भुयारी जागा आहे. शहराच्या विविध भागात विकासकांनी बांधून दिलेल्या वाहनतळांच्या पडीक जागा गर्दुल्ले, कुत्री-मांजरांनी बळकावल्या आहेत. आरक्षित जागांचा योग्य वापर करून त्या जागी रिक्षा वाहनतळ, खासगी वाहनांचे तळ उभे केले असते तर आज रस्ता-गल्ली बोळ तेथे रिक्षा वाहनतळ अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.

रेल्वे स्थानक परिसरातील वेडय़ावाकडय़ा उभ्या करण्यात आलेल्या रिक्षांमुळे जमिनीचा एक इंच तुकडा मोकळा दिसत नाही. शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ, नवीन गृहसंकुले उभी राहिली की त्या ठिकाणी नियमबाह्य रिक्षा वाहनतळ सुरू केले जात आहेत. रिक्षा वाहनतळ सुरू करण्यासाठी कुणी परवानगीची वाट पाहत नाही. शहरात कधी नव्हे इतकी वाहतूक कोंडी होत असून त्यासाठी अन्य कारणांबरोबरच रस्तोरस्ती तयार झालेले रिक्षा वाहनतळ हेही महत्त्वाचे कारण आहे. प्रवासी वाहतुकीसाठी भंगार ‘केडीएमटी’ तत्पर सेवा देऊ शकत नाही आणि ‘केडीएमटी’मुळे शहरात एसटी प्रवासी वाहतूक करू शकत नाही.

कल्याणमध्ये १२ हजार ७०३, डोंबिवलीत ११ हजार ३९९, टिटवाळ्यात एक हजार २१७, अशा एकूण २५ हजार ३१९ रिक्षा दररोज सहा ते सात लाख प्रवाशांची वाहतूक करतात. शहरातील १५ लाख लोकसंख्येसाठी उपलब्ध रिक्षा वाहतुकीसाठी पुरेशा आहेत. रिक्षा परमिट बंद असल्यामुळे चार वर्षांपूर्वी रिक्षा कमी प्रवासी अधिक स्थिती होती. आता ‘मुक्त परमिट’ परवाना धोरणामुळे मुबलक रिक्षा आहेत. आता हे प्रमाण वाढता कामा नये, असे ‘आरटीओ’, वाहतूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वाहनतळ सोडून बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालक प्रामाणिक रिक्षाचालकांच्या मुळावर उठले आहेत. उदाहरणार्थ- पत्रीपुलाजवळ उजवे वळण घेऊन ९० फुटी (ठाकुर्ली) रस्त्याकडे येताना १४ फुटी रुंदीच्या गल्लीत रिक्षा वाहनतळ आहे. या वाहनतळामुळे वर्दळीच्या या निमुळत्या रस्त्यावर ये-जा करणारी वाहने अडकून पडतात. डोंबिवलीत केळकर रस्त्यावर सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर दोन रांगांमध्ये अर्धा रस्ता अडवून वाहनतळ सुरू आहे. पालिकेच्या डोंबिवली कार्यालयाला फेर धरून वाहनांना अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहनतळ आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातही वाहनतळ, शिस्त नावाचा प्रकार येथे नाही. या शहरांचे दुर्भाग्य असे की, निवृत्तीच्या उंबरठय़ावर, बढतीच्या प्रतीक्षेत असलेले ‘आरटीओ’, वाहतूक अधिकारी येथे दोन ते अडीच वर्षासाठी येतात. यामधील बहुतेक मंडळी मुंबई किंवा ग्रामीण भागात सेवा करून आलेली असतात. ‘आरटीओ’, वाहतूक अधिकाऱ्यांनी बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला की, ‘पांढऱ्या शुभ्र’ वेषातील रिक्षा संघटना समर्थक राजकीय मंडळींकडून या अधिकाऱ्यांचा पडद्यामागून असा काही ‘उद्धार’ करतात की सेवेच्या ३५ वर्षांत त्यांनी कधी असे ‘अघोरी’ शब्द ऐकलेले नसतात. यामुळे शिस्त आणि सेवा गेली खड्डय़ात असा विचार करून अधिकारी मंडळी ‘का राजकीय जोडे खायचे’ असा विचार करून प्रशासकीय कामात व्यग्र राहतात.  रिक्षा वाहनतळ अधिकृतपणे निश्चित केले तर वाहनतळावर उभे राहून व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे रिक्षाचालकांवर कोणाचाही अंकुश नाही. या बेशिस्तीमुळे शहरातील वाहतुकीची शिस्त बिघडली आहे.