शहरातील मुख्य नाक्यांवरील कोंडीत भर; वाहतूक पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

ठाणे : मेट्रो प्रकल्प, सेवा वाहिन्यांचा विस्तार यांमुळे सुरू असलेल्या रस्ते खोदकामाचा परिणाम ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेवर पडत असताना बेकायदा रिक्षा तळही या कोंडीला हातभार लावू लागले आहेत. घोडबंदर येथील माजीवडा, मानपाडा, कापूरबावडी अशा शहरांतील मुख्य नाक्यांवर बेकायदा रिक्षा थांबे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे, माजीवडा उड्डाणपुलाखाली असलेल्या वाहतूक पोलिसांच्या चौकीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावरही अशाच प्रकारे बेकायदा रिक्षा तळ सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात ठिकठिकाणी रस्त्यांची खोदकामे सुरू आहेत. त्यामुळे ठाणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात शहरातील काही मुजोर रिक्षाचालकांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. राजकीय पक्षांच्या आधिपत्याखाली काही रिक्षा संघटना असल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून नरमाईची भूमिका घेतली जात असल्याची टीका सर्वसामान्य नागरिक करत आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दोन वर्षांपूर्वी मागेल त्याला रिक्षा परवाना हे धोरण आखल्याने शहरात रिक्षांची संख्याही वाढली आहे. या रिक्षा उभ्या करण्यासाठी चालकांना अधिकृत थांबे कमी पडू लागले आहेत. त्यामुळे शहरातील उड्डाणपुलाखालची जागा, रस्त्याच्या कडेला, महामार्गालगत असे कोठेही रिक्षा थांबे सुरू झाले असून यामुळे वाहतूक व्यवस्थेचे नियोजनच बिघडून गेले आहे. काही ठिकाणी तर रिक्षाचालकांनी टीएमटीचे बस थांबे गिळंकृत केले आहेत.

माजीवडा येथील वाहतूक पोलिसांच्या चौकीपासून शंभर मीटर अंतरावर नितीन कंपनीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवा अनधिकृत रिक्षा थांबा तयार झाला आहे. रस्त्याच्या मध्ये ७ ते ८ रिक्षा हमखास उभ्या असतात. त्यामुळे माजीवडा नाक्यावरून वळण घेऊन कापूरबावडीच्या दिशेने जाणाऱ्या खासगी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. माजीवडा नाक्याजवळ घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्या ठिकाणीही काही रिक्षाचालकांनी रिक्षा उभ्या करण्यास सुरुवात केली आहे.

मानपाडय़ाच्या उड्डाणपुलाखाली असलेल्या जागेत कासारवडवलीच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाचालकांनी अनधिकृत थांबा सुरू केला आहे. त्यामुळे मानपाडय़ाहून टिकूजीनीवाडी, किंवा घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. अनेकदा या ठिकाणी किरकोळ अपघात झाल्याचेही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

मला दररोज घोडबंदरच्या दिशेने जावे लागते. मात्र हे रिक्षाचालक भररस्त्यामध्ये रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. या रिक्षाचालकांच्या संघटना असल्यामुळे त्यांच्यासोबत सर्वसामान्य नागरिक वादही घालण्यास घाबरतात.

– रोहन कांबळे, वाहनचालक