पदवीधर नसल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांच्या पाहणी उघड

विरार : महापालिकेच्या शिक्षण विभागाने घोषीत केलेल्या वसई-विरार शहरातील अनधिकृत शाळा अद्यापही सुरू आहेत. विशेष म्हणजे या शाळांमधील शिक्षकही अपात्र असल्याचे दिसून आले आहे. या शाळांमधील अनेक शिक्षण पदवीधरही नाही, तर काही शिक्षकांचे शिक्षण केवळ दहावी-बारावी झाल्याचे उघडकीस आले आहे.

पालघर शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार वसई-विरार शहरात माध्यमिक गटातील १ हजार १४१ शाळा आहेत, त्यातील १६० शाळा अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. यातील अनेक शाळांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन त्यानुसार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र ज्या शाळा कुठल्याच नियमात बसत नाहीत, अशा नऊ अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले होते, तसेच या शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र आजही या शाळा राजरोसपणे सुरू असल्याचे शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीत उघड झाले आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून या शाळ्या सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे शिक्षण विस्तार अधिकारी माधव मद्य्ो यांनी या शाळांची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

या शाळेत मुलांना शिकवणारे शिक्षक केवळ १० वी १२ वी पास असून ते इंग्रजी माध्यमाच्या मुलांना शिकवत आहेत. काही शाळांमध्ये मुख्याध्यापक किमान पदवीधरही नाहीत. शिक्षण विभागाकडून कारवाई केलेल्या एका शाळेत बी. के. यादव आणि गॉड ब्लेस हायस्कूल या ठिकाणी पाहणी केली असता या शाळेत २५० हून अधिक विद्यार्थी आहेत. या मुलांना शिकवणाऱ्या एकाही शिक्षकाकडे कुठल्याही प्रकारची पदवी नसल्याचे दिसून आले.

अनधिकृत शाळांची पाहणी करून त्या बंद करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासानंतर करवाई केली जाईल. सोमवारपासून पुन्हा कारवाईला सुरुवात केली जाईल.

– माधव मद्ये, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर