News Flash

अनधिकृत आठवडी बाजारांचा विळखा

एका विक्रेत्याकडून दिवसाला १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतचे हप्ता वसूल केला जातो.

अनधिकृत आठवडी बाजारांचा विळखा
शहरात विविध ठिकाणी आठवडी बाजार भरला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

फेरीवालामाफिया वसई-विरारमध्ये सक्रिय; दररोज लाखो रुपयांची वसुली

वसई : वसई-विरारमध्ये फेरीवालामाफिया उदयास आले असून त्यांच्यामार्फत शहरात विविध ठिकाणी आठवडी बाजार भरला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या आठवडी बाजारातील विक्रेत्यांकडून दररोज पैसे उकळले जात असून दररोज लाखो रुपयांची वसुली केली जात आहे. या फेरीवालामाफियांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार मिळावा, त्यांच्या शेतमालाची थेट विक्री व्हावी यासाठी पूर्वी आठवडा बाजार भरवले जायचे. त्यात स्थानिक महिला, शेतकरी आपला शेतमाल आणि घरगुती उपयोगाच्या वस्तू विकायचे. मात्र वसई-विरार महापालिकेने शहरी भागात भरणारे आठवडी बाजार बंद केले आहेत. पण शहरात आता फेरीवालामाफिया उदयास आले असून त्यांनी वसई-विरार शहरात ठिकठिकाणी अनधिकृत आठवडी बाजार भरवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर, सार्वजनिक जागेत हे आठवडी बाजार भरू लागले आहेत. या आठवडी बाजारात सर्व परप्रांतीय फेरीवाले असतात. त्यांच्याकडून दररोज फेरीवालामाफियांकडून पैसे घेतले जातात. या आठवडी बाजारासाठी पदपथ व रस्ते अडवले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते, चालताही येत नाही. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सुदेश चौधरी यांनी या अनधिकृत आठवडी बाजारामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे सांगितले.

पालिकेने विकास आराखडय़ातील रस्ते मोकळे केले, लोकांनी आपल्याच जागा दिल्या पण याच रस्त्यावर फेरीवाले अतिक्रमण करून आठवडी बाजार बसवू लागल्याचा आरोप त्यांनी केला. उद्या हेच फेरीवाले या रस्त्यावर, जागेवर आपला मालकी हक्क गाजवतील, असा इशारा त्यांनी दिला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा आठवडी बाजार भरवला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका आठवडी बाजारात ५०० ते ७०० फेरीवाले बसतात. एका विक्रेत्याकडून दिवसाला १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतचे हप्ता वसूल केला जातो.

आठवडी बाजार कुठे कुठे?

* विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील शंभरफुटी रस्ता ल्ल  साईनाथ नगर

*  भातपाडा ल्ल  विवा मलांज

*  नालासोपारा येथीस मकवाना कॉम्प्लेक्स ल्ल  सनशाइन ल्ल  श्रीपस्थ

*  फनफिएस्टा ल्ल  धानिव बाग

*  वसईतील एव्हरशाइन मधुबन

आठवडी बाजार असा भरवला जातो?

फेरीवाल्यांचा आठवडी बाजार भरववणारे माफिया दररोज एक ठिकाण निवडतात. फेरीवाले तेच असतात. आज एका ठिकाणी तर उद्या दुसऱ्या ठिकाणी असे ते फिरत असतात. दररोज त्यांच्याकडून रक्कम घेतली जाते.

आम्ही फेरीवाल्यांसाठी बाजारपेठा बांधल्या आहेत. फेरीवाल्यांकडून बाजार शुल्क वसूल करतो. परंतु अशा अनधिकृत आठवडी बाजारावर आम्ही नियमित कारवाई करत असतो. अनेकदा आमच्या पथकावर हल्ले झालेले आहेत. असे सर्व अनधिकृत आठवडी बाजार बंद केले जातील.                        

– सतीश लोखंडे, महालिका आयुक्त

अनधिकृत आठवडी बाजाराचा नवा पायंडा शहरात पडला आहे. यामुळे मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागत आहे.  तक्रारी आल्या की कारवाई करतो. या कारवाईसाठी कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळायला हवा. खासगी जागेवरील आठवडी बाजारावर अद्याप कारवाई केली नाही.

– स्मिता भोईर, प्रभारी साहाय्यक आयुक्त, अतिक्रमणविरोधी पथक

स्थानिकांचे आठवडी बाजार महापालिकेने रद्द केले, परंतु परप्रांतियांचे आठवडी बाजार आता शहरभर पसरू लागले आहेत. या बाजारांनी शहरातील रस्ते, पदपथ ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत, अन्यथा खूप गंभीर परिणाम शहरांना भोगावे लागतील.

– सुदेश चौधरी, नगरसेवक, बविआ

आम्ही आठवडी बाजारवर तक्रार आली की कारवाई करतो, परंतु ते अनेक ठिकाणी बाजार बसवत असतात. काही आठवडी बाजार हे खासगी जागेवर आहेत.

– सुरेश हिनवर, फेरीवालाविरोधी पथक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2018 3:55 am

Web Title: unauthorized weekly markets in vasai
Next Stories
1 बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला आडकाठी
2 शहरबात : थंड झालेली तोफ
3 ठाणेकर अक्षतची नासाच्या अंतराळविश्वात भरारी
Just Now!
X