महापालिकेला अंधारात ठेऊन कंपन्यांचे संचालकपद भूषविले
कल्याण- डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्षेत्र अधिकारी व कर निर्धारक संकलक अनिल लाड यांनी पालिका प्रशासनाला अंधारात ठेऊन दोन खासगी कंपन्यांचे संचालकपद भूषविल्याचे उघड झाले आहे. मुंबई येथील कंपनी व्यवहार व नोंदणी मंत्रालयाने लाड हे दोन कंपन्यांच्या संचालकपदी असल्याचे लेखी पत्र पालिकेला पाठविल्यामुळे लाड यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
आतापर्यंत या दोन्ही कंपन्यांमध्ये आपले खूप कमी समभाग (शेअर्स) आहेत. या कंपन्यांकडून आपणास खूप लाभ झालेला नाही. ज्ञातस्रोतामधून आपणही गुंतवणूक केली आहे. पालिकेचे यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. त्यामुळे तक्राररादाराकडून आपल्याबाबत करण्यात आलेल्या तक्रारी बिनबुडाच्या असल्याचे स्पष्टीकरण वेळोवेळी लाड यांनी प्रशासन आणि पत्रकारांना दिले आहे. कंपनी मंत्रालयाकडून आलेल्या पत्रांमुळे लाड यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे बोलले जाते.
लाड दोन्ही कंपन्यांच्या संचालकपदी २०१२, २०१३ पासून असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्त ई. रवींद्रन यांची मर्जी संपादन करून कर विभागाच्या कायमस्वरूपी उपायुक्तपदी विराजमान होण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. आता मात्र हा मार्गही उधळला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लाड हे महापालिकेत नोकरी करून ‘महा टॅलेन्ट आयटी सोल्युशन्स प्रा. लि.’ व ‘कस्तुरी निवारा क्रिएटर्स प्रा. लि.’ या दोन कंपन्यांच्या संचालकपदी असल्याची तक्रार दक्ष नागरिक मनोज कुलकर्णी यांनी आयुक्तांकडे केली होती.