ठाणे शहरातील विस्तारीकरणाच्या प्रक्रियेत एकीकडे अधिकृतपणे घोडबंदर रोड परिसर विकसित होत असताना दुसरीकडे दिवा परिसरात स्वस्त घरांची अनधिकृत वस्ती वाढत गेली. खाडी किनारीच्या या खाजण जमिनीत रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना बेकायदा चाळींचे अमाप पीक आले. नागरी वस्तींना लागणाऱ्या अगदी प्राथमिक सुविधांचाही येथे अभाव आहे. या शहराला बाजारपेठ नाही. आरोग्य सुविधा नाहीत. ठाणे महापालिका क्षेत्रात असूनही दिव्यात टीएमटी येत नाही. पोलीस ठाणे नाही. चांगल्या दर्जाच्या शाळांचा शहरात अभाव आहे. एकही महाविद्यालय नाही. पोलीस ठाणे नसल्याने येथील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. बाराही महिने येथे पाणी आणि वीज पुरवठय़ाची बोंब असते. दिव्यातील या दिव्य राहणीमानावर एक प्रकाशझोत..

अस्वच्छतेमुळे रोगराईला निमंत्रण

स्वस्त घरांच्या आमिषामुळे दिव्याचे झपाटय़ाने नागरीकरण झाले, मात्र त्या प्रमाणात सुविधा मात्र मिळाल्या नाहीत. या अनधिकृत घरांमुळे आसरा मिळाला, पण आरोग्य मात्र बिघडले, अशी खंत दिवावासीय व्यक्त करीत आहेत. साचून राहणारा कचरा, तुंबून राहणारे सांडपाणी, यामुळे दिव्यात कायम साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव असतो. त्यात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे स्थानिक डॉक्टर सांगतात. दिवा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना येथे पालिकेच्या वतीने आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी गेली कित्येक वर्षे होत आहे, परंतु पालिकेने अद्यापपर्यंत या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या आहेत.

ठाणे शहरात विविध सुविधा पुरविणाऱ्या ठाणे महापालिकेने दिवा शहराला पहिल्यापासून सापत्नपणाची वागणूक दिली असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिक व्यक्त करतात. दिवा शहराची लोकसंख्या गेल्या दहा-बारा वर्षांत झपाटय़ाने वाढली आहे. त्यामुळे पालिकेने प्राथमिक सोयीसुविधा पुरविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र त्या आघाडीवर उदासीनता आहे. दिव्यात सार्वजनिक शौचालये नाहीत. मलनि:सारणाची योग्य व्यवस्था नाही. क्षेपणभूमीची डोकेदुखी आहे. भर रस्त्यात ठिकठिकाणी सांडपाणी वाहत असलेले आढळून येते. त्यामुळे एक अस्वच्छ आणि घाणेरडे शहर असे दिव्याचे चित्र आहे. परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य कायम धोक्यात असते.

आता आगासन, पडले गावापर्यंत दिव्याचा पसारा वाढलेला आहे. या परिसरात अर्धवट बांधकाम केलेल्या नाल्यांत मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खच आहे. परिणामी नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या घरात थेट हे मलमिश्रित पाणी येत आहे. नागरिकांचा एक एक दिवस घरात शिरलेले हे घाण पाणी काढून घर साफ करण्यातच जात आहे. नाल्यातून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांमुळे अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे पोटाचे अनेक विकार जडत आहेत. उघडे नाले, रस्त्यावरील साचलेले सांडपाणी यावर डासांची मोठय़ा प्रमाणावर पैदास होत असून यामुळे डेंग्यू, मलेरिया या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. अनेक नागरिक साथीच्या तापाने आजारी असून पालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबतीत सर्वेक्षण करण्याचे सौजन्यही दाखविले नसल्याचे नागरिक सांगतात.

 कळवा हॉस्पिटलचा आधार

दिवा परिसरात ठाणे महानगरपालिकेचे एकही आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे येथील सर्वसामान्य रहिवाशांना ऐपत नसतानाही खासगी डॉक्टरांकडे जावे लागते. त्यातील अनेक जण कळवा येथील शिवाजी रुग्णालयाचा आधार घेतात. कळवा हे लांब पडत असल्याने काही नागरिक डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी येतात.

स्थानक परिसरात सार्वजनिक शौचालय नाही

पालिकेच्या वतीने दिवा शहरात एकही सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेले नाही. चाळी किंवा ग्रामीण भागात काही ठिकाणी एमएमआरडीएच्या वतीने शौचालये बांधण्यात आलेली आहेत. मात्र स्थानक परिसरात त्याची नितांत आवश्यकता आहे, कारण ती सोय नसल्याने अनेक जण आडोसा पाहून उघडय़ावरच लघुशंका करतात. त्यामुळे स्थानक परिसरात दरुगधीचे साम्राज्य असते.

मलनि:सारण व्यवस्था कोलमडलेली

समस्यांनी वेढलेल्या दिव्यात मलनि:सारण व्यवस्थेचेही तीनतेरा वाजलेले आहेत. अनेक ठिकाणी नाले बुजवून त्यावर बांधकाम केले असल्याने मलमिश्रित पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच राहिलेली नाही. मलमिश्रित पाणी अनेक ठिकाणी साचलेले असल्याने त्यावर डासांची मोठय़ा प्रमाणावर पैदास होत आहे. मुंब्रा देवी कॉलनी परिसरातील रस्त्यावरून तर सांडपाणी वाहत आहे. या वाहणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होण्याची कोणतीही सोय नसल्याने ते याच परिसरात साचून रहाते. त्यामुळे त्या भागातून चालणेही नागरिकांना मोठे जिकिरीचे ठरत आहे.

बैठकीनंतरही प्रश्न जैसे थे

शीळफाटा येथे आरोग्य केंद्र, शीळफाटा आणि दिवा परिसरांमध्ये अग्निशमन केंद्र उभारणे, खर्डी परिसरातील स्मशानभूमी यांसह चुआ ब्रिज ते साबे आगासन रस्ता यांसह दिवा येथील नागरी प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि आमदार सुभाष भोईर यांची एक संयुक्त बैठक गेल्या सप्टेंबर महिन्यात झाली होती.

डम्पिंगचा त्रास कमी होईना

दिव्यात सीआरझेड नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून बेकायदा डम्पिंग ग्राऊंड चालविले जात आहे. सततच्या विरोधानंतरही हे डम्पिंग ग्राऊंड सुरूच आहे. २००५ सालापासून येथे दररोज २०० मेट्रिक टन कचरा टाकला जातो. कचऱ्यासोबतच काही रसायनमाफिया येथे राजरोसपणे रसायने खाली करत असतात. डिसेंबर २०१५ मध्ये येथील रसायनांच्या पिंपांना आग लागली होती. रसायनांच्या आगीमुळे झालेल्या वायुबाधेचा फटका दिव्यातील रहिवाशांना बसला होता. कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. नागरिकांनी याविरोधात अनेकदा रास्ता रोको केले, पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला, परंतु काही एक फरक पडलेला नाही.