23 October 2018

News Flash

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता कराल तर.. सावधान!

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ शहर मोहीम’ सर्वत्र राबवण्यात येत आहे.

दंडात्मक कारवाई करण्याचा मीरा-भाईंदर महापालिकेचा निर्णय

सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणार असाल अथवा  अस्वच्छ करणार असाल तर यापुढे सावधान.. अशा नागरिकांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर दंड आकारण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आल्याने मीरा-भाईंदर महानगरपालिकेने या आदेशांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ शहर मोहीम’ सर्वत्र राबवण्यात येत आहे. शहरांची स्वच्छता राखणे या महत्त्वाच्या मुद्दय़ाचा यात समावेश आहे, परंतु अनेकवेळा आवाहन करूनही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणांची अस्वच्छता करण्याचे काम सुरूच असते. रस्त्यात कचरा फेकणे, थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे तसेच शौचाला बसणे या नागरिकांच्या सवयी अद्याप दूर झाल्या नसल्याने स्वच्छता अभियानात मोठाच अडसर होत आहे. आता नागरिकांच्या  या सवयीला वेसण घालण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश शासनाने सर्व महान्पालिकांना दिले आहेत. या आदेशांची मीरा-भाईंदर महापालिकेकडून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नागरिकांना उघडय़ावर शौचाला बसू नये अथवा लघुशंका करू नये यासाठी महापालिकेने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. शहर अस्वच्छ केल्याबद्दल नागरिकांवर दंड आकारण्याचे अधिकार मात्र महापालिकेला नव्हते. यासंदर्भातले दंडात्मक करावाईचे शुल्क निश्चित करून ते नियम महानगरपालिकेने मान्यतेसाठी शासनाकडे काही वर्षांपूर्वी पाठवले आहेत, परंतु शासनाकडून त्याला मान्यता मिळाली नसल्याने दंड वसूल करणे प्रशासनाला अशक्य झाले होते. परिणामी नागरिकांना शहर अस्वच्छ करण्यापासून रोखण्यासाठी त्यांना विनंती करणे, सुरक्षा रक्षक नेमणे आदी उपाययोजना केल्या. मात्र त्यानंतरही नागरिक ऐकत नसल्याने प्रशासनाने गांधीगिरीचा अवलंब केला. उघडय़ावर लघुशंका अथवा शौचाला बसल्यास संबंधित व्यक्तीला गुलाब फुल देणे अथवा त्याला हार घालून त्याचा सत्कार करणे यासारखे उपायही केले आहेत, परंतु या उपायांचाही फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.

दंड असा..

  • सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी निष्काळजीपणे कचरा टाकल्यास : १५० रुपये
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास :१०० रुपये
  • उघडय़ावर लघुशंका केल्यास : १०० रुपये
  • उघडय़ावर शौचाला बसल्यास : ५०० रुपये

शासनाच्या आदेशांची तातडीने अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांना शहर अस्वच्छ करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका

First Published on January 4, 2018 2:53 am

Web Title: uncleanness in public place mira bhayander municipal corporation