|| हेमेंद्र पाटील

सदनिकांचे सांडपाणी, कचरा थेट मुख्य रस्त्यावर, साथीचे आजार बळावले

बोईसर परिसराचा दिवसेंदिवस  उकिरडा होत  चालला आहे. मुख्य रस्त्यावर ठिक ठिकाणी कचरा आणि गटारांतील पाणी वाहत आहे. खैरापाडा हद्दीत येणाऱ्या यशवंतसृष्टी परिसरात तर सदनिकांचे सांडपाणी आणि कचरा थेट मुख्य रस्त्यावर आल्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अस्वच्छतेमुळे बोईसर परिसरात नागरिकांच्या विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे.

बोईसरमधील स्वच्छता  ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर जात आहे.  तरीही प्रमाणात बांधकामांना परवागी दिल्या जात आहेत. यामुळे सांडपाण्याची कोणत्याही प्रकारची उपाययोजना नसल्याने शौचालयाचे सांडपाणी देखील रस्त्याच्या बाजूला वाहत आहे. येथील नैसर्गिक नाले घनकचरा आणि सांडपाण्याने तुडुंब भरले आहेत. नाल्याच्या बाजूला मोठय़ा प्रमाणात नागरी वसाहती आहेत.

यशवंतसृष्टी भागात मुख्य रस्त्यावर गटाराचे पाणी साचले आहे. येथील इमारती मधला कचरा रस्त्याच्या बाजूलाच टाकला जात आहे. त्यामुळे या भागातून नागरिकांना चालणे कठीण बनले आहे. सांडपाण्याच्या दरुगधीमुळे अनेकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे.

सांडपाणी सर्वत्र पसरल्याने त्यावर डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले आहे. बोईसर, सरावली, खैरापाडा या भागात मोठय़ा प्रमाणात बांधकामे फोफावत असुन कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध नसताना देखील जिल्हा प्राधिकरणाने बांधकामांना परवानग्या देण्याचा सपाटाच लावला आहे.

याभागात एकाही विकासकाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवला नसताना देखील जिल्हा प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष केले आहे.  इमारतींचे सांडपाणी थेट नाल्यात सोडले जाते हेच सांडपाणी काही ठिकाणी रस्त्यावर येवून रोगराई पसरत आहे. त्यातच वसाहतीतून निघणारा कचरा रस्त्याच्या बाजुलाच फेकला जात असल्याने बोईसर परिसरात फिरताना सर्वच ठिकाणी नाकावर हात ठेवून चालावे लागते. यामुळे बोईसर परिसर अतिशय गलिच्छ बनत चालला आहे.

दोन डॉक्टरांसमोर रोज ३०० रुग्ण

बोईसर ग्रामीण रुग्णायात रोज ३०० रुग्ण बाविभागात उपचार घेण्यासाठी येत आहेत. याते १३०च्या आसपास रुग्ण साथीच्या तापाचा उपचार घेण्यासाठी येत आहेत. अतिशय छोटय़ा जागेवर असलेल्या बोईसरचे ग्रामीण रुग्णालयात येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या दोन आणि रुग्ण ३०० असे गुणोत्तर आहे.  यामुळे बोईसर परिसरात प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याकडे लक्ष देवुन उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना नागरीकांनी व्यक्त केली.

रस्त्यावर गटारांचे सांडपाणी साचल्याने विषमज्वर आणि साथीच्या आजार होण्याची शक्यता आहे. नागरीकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून  उघडय़ावरचे खाणे टाळले पाहिजे.  – डॉ. मनोज  शिंदे, वैद्य्कीय अधिकारी बोईसर ग्रामीण रुग्णालय