शहरी विभागातील स्वच्छतेची कल्पना अतिशय संकुचित असून सर्वसाधारणपणे आपल्या घरातील कचरा बाहेर टाकणे एवढय़ापुरतीच ती सीमित आहे. कचऱ्याबाबतचे तेच वर्तन महानगरांच्या पातळीवरही प्रतिबिंबित होताना दिसते. शक्यतो कचरा शहराबाहेर असावा, असा प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून केला जातो. मात्र दूरवर कचरा नेऊन टाकणे म्हणजे कचरा व्यवस्थापन नाही. त्याने फक्त आपल्या विभागातील समस्या दुसऱ्या विभागात नेऊन टाकण्यासारखे आहे. मुंबई महानगर परिक्षेत्रातील महापालिका तळोजा येथील सामायिक क्षेपणभूमीत कचरा टाकण्याचा प्रयत्न करून नेमके तेच करू पाहत आहेत. मात्र त्याऐवजी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने कचरा व्यवस्थापन केले तर मुळात ही समस्याच उद्भवणार नाही, हे ठाणे परिसरात अनेकांनी संस्थात्मक तसेच वैयक्तिक पातळीवर दाखवून दिले आहे.
एक तपापूर्वी गणेशमूर्ती विसर्जनामुळे नामशेष होऊ पाहणारे ठाण्यातील तलाव वाचविण्यासाठी येथे कृत्रिम तलावांचा पर्याय उपयोगात आणला जाऊ लागला. त्याचे पुढे महाराष्ट्रभर अनुकरण झाले. समर्थ भारत व्यासपीठ, पर्यावरण दक्षता मंच, जिज्ञासा आदी संस्था शहरात राबवीत असलेल्या पर्यावरणस्नेही उपक्रमांमध्ये कचरा व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा उपक्रम असतो. प्लॅस्टिकचा कमीतकमी वापर, जास्तीतजास्त पुनर्वापर, कागदी पिशव्यांचा प्रसार हे अप्रत्यक्षपणे कचरा व्यवस्थापनच असते. समर्थ व्यासपीठ या संस्थेने महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने विसर्जन काळात निर्माल्य गोळा करून त्यापासून खतनिर्मिती केली. त्यांनी निर्माल्यापासून बनविलेले खत नागरिकांना समारंभपूर्वक दिले. त्यामुळे बरीच जनजागृती झाली. काही सोसायटय़ांमध्येही सामूहिक कचरा व्यवस्थापन प्रणाली राबवली आहे. तारांगण सोसायटीने नव्या वर्षांचा संकल्प म्हणून आवारात सामूहिक गांडूळ खत प्रकल्प राबविला, त्यामुळे त्या सोसायटीतील कचरा आता डम्पिंग ग्राऊंडवर जात नाही. ठाण्यातीलच कोरस सोसायटीने अशा प्रकारच्या कचरा व्यवस्थापनातून मिळणाऱ्या खतापासून आवारात उद्यान फुलविले आहे.
प्लॅस्टिकचे यशस्वी विघटन
सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानातील तज्ज्ञ डॉ. महादेव शरण व डॉ. माधुरी शरण या संशोधक दाम्पत्याने प्लॅस्टिकचे यशस्वीपणे विघटन करून त्यापासून मेण आणि द्रवरूप इंधन बनविले. परिसरातील संबंधित महापालिका वा एमएमआरडीए या प्रयोगावर आधारित प्रकल्प राबवून प्लॅस्टिकच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकतात.
शून्य कचरा
सोसायटीत सामूहिकरीत्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात कदाचित जागेची अडचण अथवा मतभिन्नता असू शकते. त्यामुळे त्याऐवजी घरच्या घरीच कौटुंबिक पातळीवर ओल्या कचऱ्याचे विघटन केल्यास मुळात कचऱ्याची समस्याच उरणार नाही. ठाण्यात कौस्तुभ ताम्हनकर, जयंत जोशी आदी पर्यावरणप्रेमींनी हे सिद्ध करून दाखविले आहे. घरच्या घरी कचऱ्याचे विघटन करणारे त्यांचे प्रयोग ‘शून्य कचरा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आहेत. सध्या या दोघांसह अनेकजण व्यक्तिगत पातळीवर या योजनेचा प्रसार करीत आहेत.