28 September 2020

News Flash

जमिनीखालील धरणेच अधिक उपयुक्त ठरणार

पर्जन्य जलसंचयनाद्वारे जमिनीखाली तयार केली जाणारी धरणेच अधिक सुरक्षित आणि फलदायी ठरतील,

जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांचे प्रतिपादन
भरमसाटखर्च, अनेक गावांचे विस्थापन आणि हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली घालून बांधण्यात आलेली धरणे कालांतराने गाळाने भरतात, निरूपयोगी ठरतात. त्यामुळे पर्जन्य जलसंचयनाद्वारे जमिनीखाली तयार केली जाणारी धरणेच अधिक सुरक्षित आणि फलदायी ठरतील, असे मत जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी येथील अंबर-संवाद उपक्रमांतर्गत आयोजित प्रकट मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.
अफाट लोकसंख्या, अर्निबध वापर, जलसाक्षरतेचा अभाव, मोठय़ा प्रमाणात असलेली गळती आणि प्रदुषण यामुळे सध्याची भीषण पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरे तर शासकीय प्राधिकरणांकडून पुरविले जाणारे शुद्ध पाणी हे फक्त पिण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. इतर उपयोगासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था प्रत्येकाने विहीरी, कुपनलिकांद्वारे करायची आहे. मात्र त्याबाबतीत कमालीची उदासिनता दिसून येते. किमान आता टंचाईच्या झळा बसल्यानंतर तरी आपण जागे होऊया. प्रत्येकाने आपापल्या आवारात जलसंधारण करूया. त्यामुळे भूजल पातळी वाढून विहीरी, कूपनलिकांद्वारे ते उपलब्ध होईल, असेही गुणवंत पाटील म्हणाले.
झाडांमुळे नैसर्गिकरित्या मोठय़ा प्रमाणात जलसंधारण होते. मात्र गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाली. जंगले उजाड झाली. शहर असो वा गाव आता मानवी वस्त्यांमध्ये मोकळी जमीन फारशी दिसत नाही. लाद्या अथवा कोबा घालून जमिनीत पाणी मुरण्याच्या वाटाच बंद करण्यात आल्या. त्यामुळे मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यात अनेक गावे, शहरे टंचाईग्रस्तच राहतात. किमान आता तरी प्रत्येकाने आपली नीती बदलून अधिकाधिक पाणी कसे जमिनीत मुरेल हे पाहिले पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले.
‘अंबर भरारी’ मासिक संवाद उपक्रमांतर्गत पत्रकार गणेश गायकवाड आणि निखील चौधरी यांनी गुणवंत पाटील यांच्याशी संवाद साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 2:43 am

Web Title: underground dam more secure for water storage
Next Stories
1 तरुणाईने साक्षर नव्हे, सुशिक्षित होणे आवश्यक!
2 अनधिकृत धार्मिक स्थळांना एक महिन्याची मुदत
3 सोनेखरेदीचा मुहूर्त हुकणार!
Just Now!
X