येत्या सभेत प्रस्ताव
ठाणे रेल्वे स्थानक परिसर कोंडीमुक्त व्हावा यासाठी रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेणाऱ्या ठाणे महापालिकेने याच परिसरात भुयारी बाजारपेठ आणि वाहनतळ उभारणीचा निर्णय घेतला आहे. ठाणे रेल्वे स्थानक ते कोर्ट नाका या वर्दळीच्या परिसरात दिल्लीच्या धर्तीवर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार असून या भागातील शेकडो विक्रेत्यांना या भुयारी बाजारपेठेत हलविण्याचा बेत आखला जात आहे.
ठाणे शहराची मुख्य बाजारपेठ रेल्वे स्थानक परिसरात भरते. गर्दीच्या वेळेत या भागातून चालणेही कठीण होऊन बसते. दाटीवाटीच्या या परिसरात वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नाही. बाजारपेठेत वस्तू खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानकास लागूनच दोन हजार वाहने उभी राहतील अशा पद्धतीचे वाहनतळ उभारणीचे काम हाती घेतले आहे. तरीही ठाणे बाजारपेठ परिसरातील कोंडीवर हा उतारा ठरणार नाही हे एव्हाना महापालिका प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे गेल्या काही आठवडय़ांपासून या परिसरातील वाढीव बांधकामे पाडून रस्ता रुंदीकरणाची मोहीम अतिक्रमणविरोधी पथकाने सुरू केली आहे. या भागातील कोंडीवर कायमचा उतारा म्हणून सुभाष पथ ते दादोजी कोंडदेव स्टेडियम या भागातील जुन्या महापालिका मुख्यालयाच्या शेजारील अठरा मीटर रुंदीचा रस्ता तसेच स्टेडियमसमोरील सुविधा भूखंडाखाली भूमिगत स्वरूपाची बाजारपेठ तसेच वाहनतळाची उभारणी केली जाणार आहे.

वाहतुकीत बदल : ठाणे स्थानक परिसरातील बाधित बांधकामे काढल्यानंतर या रस्त्याची डागडुजी तसेच बांधकाम साहित्य उचलताना कोणताही अपघात होऊ नये यासाठी सुभाष पथ ते जुनी महापालिका इमारत आणि जनता फॅशन हाऊस ते अशोक टॉकीज हा महत्त्वाचा रस्ता पुढील आठवडाभर वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी रात्री उशिरा घेतला. वरील दोन रस्त्यांवर महापालिकेचे कामगार आणि दुकानदार यांनाच प्रवेश दिला जाईल, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.