वर्षभरानंतर नवी दिल्लीतून ठकसेनास अटक

वसई: नोकरीसाठी केवळ १० रुपये भरण्यास सांगून ५० हजारांचा गंडा घालणाऱ्या एका ठकसेनास वसई रेल्वे पोलिसांनी एक वर्षांनंतर नवी दिल्ली येथून अटक केली आहे. या ठकसेनाने मीरा रोड येथील तरुणास नोकरी पाहिजे तर संकेतस्थळावर १० रुपये भरून नोंदणी करण्यास सांगितले होते. मात्र, ही नोंदणी करताना बँकेचे तपशील मिळवून ५० हजारांचा ऑनलाइन गंडा घातला होता.

मीरा रोडमधील सुनील कुमार गौड (२७) या बेरोजगार तरुणाला मार्च २०१९ मध्ये एक निनावी दूरध्वनी आला होता. आमच्याकडे नोकऱ्या उपलब्ध असून जॉबशाईन या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास सांगितले. त्याचे शुल्क केवळ १० रुपये होते. १० रुपयांत नोकरी मिळणार असेल तर नोंदणी करण्यास हरकत नाही, असे गौड याला वाटले आणि त्याने जॉबशाईन या संकेतस्थळावर नोंदणी करून स्वत:चे तपशील दिले. त्या ठिकाणी पेमेंट रकान्यात बँकेचे तपशील विचारले होते. ते तपशील गौडने भरले होते. त्यानंतर गौडला पेटीएमद्वारे १० रुपये भरण्यास सांगितले. ते १० रुपये गौडने भरले, मात्र त्याच्या बचत खात्यातून १० रुपयांऐवजी ५० हजार रुपये काढून घेण्यात आले होते. गौडकडून बँकेचे तपशील मिळवून त्याला गंडा घालण्यात आला होता. याबाबत वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.

असा सापडला आरोपी

ठकसेनाने पेटीएमद्वारे पैसे दिल्लीतील एसबीआय बॅंकेच्या खात्यात वळवले होते. त्यामुळे वसई रेल्वे पोलिसांनी पेटीएम कंपनीला संपर्क करून त्या खात्याची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी ते खाते गोठवून संबधित खातेदाराला ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्य आरोपी हा अभिनव किशोरीलाल गुप्ता (२८) हा असल्याचे समोर आले. गुप्ता याने आपल्या मित्राला पेटीएमद्वारे पैसे येतील ते काढून दे असे खोटे सांगितले होते. मात्र, पोलीस गुप्तापर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली, अशी माहिती वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी दिली. बेरोजगार तरुण नोकरीसाठी विविध ठिकाणी अर्ज करतात. त्यांचे तपशील मिळवून त्यांना गंडा घालण्याची ही नवीन पध्दत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात अन्य दोन आरोपी असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती निकम यांनी दिली.