मद्यपी तरुणाला पोलिसांकडून अटक

आपले व्यसनांचे शौक पूर्ण करण्यासाठी मीरा रोडमधील एका बेरोजगार तरुणाने चक्क आपल्या मावशीचीच अत्याधुनिक कार चोरली. पोलिसांना त्याच्यावर संशय होताच, मात्र सबळ पुरावा नव्हता. मग पोलिसांनी चातुर्याने तपास करत या कारचोराला गजाआड केले.

मीरा रोडमधील व्यावसायिक अदिबुल चौधरी यांची अत्याधुनिक गाडी त्यांच्या इमारतीखालून चोरीला गेली होती. त्याबाबतची तक्रार त्यांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात दाखल केली. त्या वेळी त्यांच्या पत्नीचा भाचा झाहीन खान हादेखील सोबत होता. पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात चेहरा रुमालाने झाकलेला एक तरुण गाडी चोरून नेताना दिसून आला. पोलीस तपासात गाडी अत्याधुनिक असून ती बनावट चावीने उघडण्याचा प्रयत्न केला तर अलार्म वाजतो, अशी माहिती पुढे आली; परंतु या प्रकरणात तसा प्रकार घडला नव्हता, शिवाय कारबाबत गाडीच्या शोरूममध्ये पोलिसांनी विचारणा केली असता गाडी अत्याधुनिक असल्याने बटन दाबून सुरू होत असून ती बनावट चावीने उघडणे अशक्य असल्याचे पोलिसांना समजले. चौधरी यांच्या घरातील कारची आणखी एक चावी बेपत्ता असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारचा दरवाजा मूळ चावीनेच उघडण्यात आला असून या चोरीत चौधरी यांच्या निकटवर्तीयाचा हात असल्याचे स्पष्ट झाले.

चौधरी यांच्यासोबत आलेला झाहीन हा बेरोजगार असून तो मद्यपी असल्याची माहिती पोलिसांनी काढली. त्यामुळे संशयाची सुई झाहीनवरच केंद्रित झाली; परंतु चौकशीत तो ताकास तूर लागू देत नव्हता. झाहीनच्या मोबाइल लोकेशनची तपासणी केली असता तो या कालावधीत अनेक वेळा भिवंडी आणि नायगाव येथे गेल्याचे दिसून आले. मात्र झाहीनने आपण या ठिकाणी कधी गेलोच नसल्याचे ठामपणे सांगितल्याने पोलिसांचा त्याच्यावरचा संशय अधिकच बळावला, परंतु ठोस पुरावा नसल्याने पोलीस काहीच करू शकत नव्हते. या ठिकाणी शक्तीऐवजी युक्तीच श्रेष्ठ ठरेल, असा विचार करून पोलिसांनी मग झाहीनच्या मद्यपी मित्रांना विश्वासात घेतले. त्यांच्या गरजा पूर्ण करत त्यांना झाहीनकडून माहिती काढण्यास सांगितले. एके दिवशी झाहीन मित्रांसमवेत मद्यपान करत असतानाच मद्याच्या नशेत मित्रांसमोर आपली झाकलेली मूठ उघड केली. आपल्याकडे एक कार असून त्याचे इंजीन विकायचे आहे. कोणी गिऱ्हाईक असेल तर सांगा, खरं तर आपल्याला कारच विकायची होती, परंतु तसे गिऱ्हाईक मिळत नसल्याने त्याचे स्पेअर पार्ट विकायचे असल्याचे त्याने मित्रांना सांगितले.

मित्रांनी ही गोष्ट पोलिसांच्या कानावर घातली. पोलिसांनी लगेचच बोगस गिऱ्हाईक तयार करून त्याची झाहीनसोबत भेट घडवून आणली. झाहीन त्याला घेऊन नायगाव येथे गेला. त्या ठिकाणी एका मोकळ्या जागी चोरलेली कार झाहीनने उभी करून ठेवली होती. चौधरी यांची चोरीला गेलेली कार हीच असल्याचे स्पष्ट झाल्यावर या बोगस गिऱ्हाईकाने पोलिसांना इशारा केला. दोघांच्या पाठोपाठ असलेल्या पोलिसांनी झाहीनला मुद्देमालासह अटक केली.