कल्याण-डोंबिवली दरम्यान रात्रीचा प्रवास धोक्याचा

कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान रात्रीच्या वेळी अंधाराचा आडोसा घेत काही अज्ञात माथेफिरू धावत्या लोकलवर दगड भिरकावू लागल्याने या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी प्रवाशी करू लागले आहेत. कल्याण येथील एका तरुणीने यासंबंधी समाजमाध्यमाद्वारे मोहीम सुरू केली आहे.

कल्याण येथे राहणारी ही तरुणी दोन दिवसांपूर्वी रात्री १०.४७ च्या दरम्यान ठाण्याहून कल्याणच्या दिशेन प्रवास करत होती. ठाकुर्ली व कल्याण दरम्यान असलेल्या झाडा-झुडपांमधून धावत्या लोकलवर दगड मारल्याचा प्रकार त्यावेळी घडला. प्रवासी बसलेल्या आसनालगत हा दगड येऊन पडला. या घटनेत कुणालाही ईजा झाली नसली तरी रात्रीच्या वेळेत लोकल गाडय़ांवर दगड भिरकविण्याचे प्रकार वारंवार घडू लागल्याच्या तक्रारी या माध्यमातून पुढे येऊ लागल्या आहेत.

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महिला डब्यामध्ये पोलीस कर्मचारी तैनात असतात. असे असतानाही महिला डब्यांना लक्ष्य करत असे प्रकार घडू लागल्याने प्रवाशांमध्ये भीती आहे. मागील चार महिन्यांत या मार्गावर घडलेली ही चौथी घटना असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. आतापर्यंत दाखल झाले नसलेले आणखीही असेच काही प्रकार या ठिकाणी घडले असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील घटना नित्याच्या

लोकल ट्रेनवर दगड मारण्याचे प्रकार आता नित्याचे झाले आहेत, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. यापूर्वी बदलापूरला राहणारी दर्शना पवार हिचा बदलापूर-अंबरनाथ दरम्यान चालत्या लोकलवर भिरकावलेला दगड लागल्याने मृत्यू ओढवला होता. काही महिन्यांपूर्वीच अंबरनाथच्या सुप्रिया मोरे हिला दगड लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर महिनाभरापूर्वी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी अंबरनाथ येथील आदिल शेख या तरुणासही भिरकावलेला दगड लागून डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. दगड फेकण्याचे प्रकार वाढीस लागल्याने यामध्ये प्रवाशांना इजा होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.

एरवी सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचे धडे देण्याऐवजी त्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे लक्ष द्या.

-लता आरगडे, उपाध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना.