महावितरणच्या मान्सूनपूर्व दुरुस्ती व देखभाल कामांमुळे कल्याण-डोंबिवली शहरात सध्या वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असले, तरी येत्या काळात येथील नागरिकांची या त्रासातून मुक्तता होण्याची शक्यता आहे. विद्युतपुरवठा खंडित होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी महावितरणने ‘रिंग मेन युनिट’ तंत्रज्ञान राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे एखाद्या विभागाचा वीजपुरवठा खंडित झाला तरी, पर्यायी वाहिनीतून तेथील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे.  
वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अशी सुविधा कार्यान्वित करण्यात येत असल्याचे महावितरणचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव यांनी सांगितले. डोंबिवली शहरात मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी केल्या जाणाऱ्या खोदकामांमुळेही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार कमी व्हावेत यासाठी नवे केंद्र उभारणीचे काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत ‘रिंग युनिट’ कार्यान्वित करण्यात येईल, असे ते म्हणाले. वीजपुरवठा करणाऱ्या एखाद्या वाहिनीत दोष निर्माण झाल्यास त्या वाहिनीवरून होणारा वीजपुरवठा संबंधित विभागात पर्यायी व्यवस्थेद्वारे पुरवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
डोंबिवली शहरात रस्त्यांची कामे सुरू असताना सुविधा वाहिन्यांच्या माध्यमातून नव्या वाहिन्या टाकून ही व्यवस्था उभी केली जात आहे. हे काम सुरू असल्याने काही भागात वारंवार विजेचा पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी असल्या, तरी काही दिवस रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.