अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे प्रतिपादन

केंद्रीय अर्थसंकल्पात प्रथमच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या व्यवस्थेतून रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच उद्योगव्यवसायांना किफायतशीर मार्ग उपलब्ध होणार आहेत. अधिकाधिक रस्त्यांचे जाळे विणले तर वाहनांची धावसंख्या कमी होऊन कमी वेळेत अधिक माल वाहून नेणे शक्य होणार आहे. तीच परिस्थिती जलवाहतुकीबाबत असणार आहे. किनाऱ्यावरचे उद्योजक, कोकणातील आंबा व्यावसायिक या सुसंधीचा सर्वाधिक लाभ उठवू शकतात, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी रविवारी येथे केले.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि टीजेएसबी बँक यांच्यातर्फे अर्थतज्ज्ञ टिळक यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम टिळकनगर शाळेच्या पटांगणात आयोजित केला होता. या वेळी टिळक यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते माधव जोशी, संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते. आतापर्यंत महसूल मिळवून देणारे, पण दुर्लक्षित असलेल्या लहान विषयांना अधिक महत्त्व अर्थसंकल्पात देण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात महसूल मिळेल असे गणित यापूर्वी फारसे कुणी केले नव्हते. क्रीडा स्पर्धा हेही उलाढालीचे मोठे साधन आहे हे यंदाच्या अर्थसंकल्पात दाखवून देण्यात आले आहे.

गुवाहटी येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धामुळे या भागात हॉटेल व्यवसाय तेजीत आला. तसेच फळफळावळ यांची आवक वाढली. परकीय चलन, अन्य व्यवसाय, उद्योगांना बरकत आली. सर्व राज्य सरकारांनी स्थानिक भागात उलाढाल कशी तवाढेल अशा विषयांकडे लक्ष केंद्रित करण्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सूचित केले आहे. बँकांचे विलीनीकरण, ग्रामीण भागाकडे अर्थसंकल्पाने दिलेले लक्ष, पीक विमा योजना या विषयांवर टिळक यांनी उदाहरणासह विस्तृत माहिती दिली. या वेळी कोटक म्युच्युअल फंडाच्या उपाध्यक्षा स्नेहल दीक्षित, नि. द. शेंबेकर उपस्थित होते.