मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामांत दिरंगाई केल्याने खरडपट्टी

ठाणे : केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या माध्यमातून ठाणे शहरात सुरू असलेल्या मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याच्या कामात दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी बुधवारी ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. केंद्र सरकार शहरांच्या विकासकामांसाठी निधी देते आणि त्याचा तुम्हाला विनियोग करता येत नाही. अपूर्ण कामावरून सरकारची बदनामी करायला मग सगळे मोकळे, अशा शब्दात पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

ठाणे जिल्ह्य़ातील विविध महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता असून पालकमंत्री एकनाथ िशदे यांचा येथील राजकारणावर वरचष्मा आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलांमध्ये भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना संधी देऊन भाजपने ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेला आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत पाटील यांनी केंद्र सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या निधीच्या मुद्दय़ावरून ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांना फटकारल्याने आगामी संघर्षांची ही नांदी असल्याची चर्चा रंगली आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण शहरात मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात येत आहेत. तसेच घरांमधील मलवाहिन्या या मुख्य वाहिनीला जोडण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून ही कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी राज्य शासनासह महापालिकेचा निधीही खर्च करण्यात येत आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही कामे संथगतीने सुरू आहेत. त्याचा फटका शहरातील वाहतुकीलाही बसत आहे. यामुळे पालिकेच्या कारभारावर टीका होत असतानाच बुधवारी झालेल्या जिल्हा विकास समन्व्यय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनीही या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाणे शहरामध्ये सुरू असलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामांची माहिती सादर करण्याची सूचना पाटील यांनी पालिका प्रशासनाला बैठकीत केली. त्यानुसार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामाची माहिती सादर केली.

२०१५ मध्ये अमृत योजनेअंतर्गत ठाणे शहरात ६० किमीच्या मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी केंद्राकडून ५७ कोटी, राज्य शासनाकडून २८ कोटी आणि महापालिकेकडून  ६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत ६० किमीपैकी ५६ किमीचे काम पूर्ण झाले आहे, तर १ किमीच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे माळवी यांनी बैठकीत सांगितले. तसेच उर्वरित काम डिसेंबपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगितले. परंतु सहा वर्षे उलटूनही ही कामे पूर्ण का झाली नाहीत, अशी विचारणा करत महत्त्वाच्या कामांमध्ये ढिलाई कशासाठी, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अर्धवट कामे, दर्जा लक्ष्य

ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांत सुरू असलेल्या विविध विकासकामांची रखडपट्टी तसेच दर्जाविषयी सातत्याने तक्रारी पुढे येत आहेत. महापालिकेने हाती घेतलेली चौपाटी विकासाची कामे, जुने ठाणे – नवे ठाणे सारखे वादग्रस्त प्रकल्प, रस्त्यांचा निकृष्ट दजा, मलनिस्सारण कामांची रखडपट्टी यांसारखे मुद्दे आगामी निवडणुकीत गाजण्याची चिन्हे असून कपिल पाटील यांनी नेमक्या याच मुद्दय़ावरून धारेवर धरल्याने शिवसेनेच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे.