निवडणुकीतील उमेदवार म्हटलं की डोळय़ांसमोर आपसूकच परीटघडीचे पूर्ण पांढऱ्या रंगाचे कपडे, काळा गॉगल, गांधी टोपी किंवा भगवा फेटा परिधान केलेल्या व्यक्तीचे चित्र डोळय़ांसमोर उभे राहाते. अंबरनाथ तहसील कार्यालयात गुरुवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मतमोजणीसाठी झालेल्या गर्दीत असेच चित्र पाहायला मिळत होते. मात्र, याच गर्दीतून वाट काढत पुढे सरकणाऱ्या करडी हाफ पँट आणि साधा शर्ट घातलेल्या एका उमेदवाराने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अतिशय साध्या, नेहमीच्या पेहरावात दाखल झालेला हा उमेदवार विजयी झाल्याचे जाहीर होताच, उपस्थितांना आपसूकच त्याच्या विजयाचे गमकही उमजले.

अंबरनाथ पंचायत समिती आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला सकाळी दहाच्या सुमारास सुरुवात झाली. सुरुवातीला चरगाव गट तसेच चोण आणि चरगाव गणांची मतमोजणी होणार होती. त्यामुळे तेथील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या ठिकाणी येण्यासाठी उद्घोषणा केली जात होती. त्याचवेळी करडय़ा रंगाची अर्धी पॅंट आणि काळ्या रेघा असलेला पांढरा शर्ट घातलेली एक व्यक्ती पुढे आली. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच मोठा पोलीस बंदोबस्त होता. ओळखपत्राशिवाय कुणालाही आत प्रवेश नव्हता. त्याचवेळी शर्टाची दोन बटने मोकळी सोडलेला, लांब केसांचा एक इसम प्रवेशद्वारावर ओळखपत्र दाखवू लागताच पोलिसांच्या भुवया उंचावल्या. राजकीय पक्षाचा उमेदवार म्हटला तर पांढरा सदरा, पांढरा पायजमा, त्यात शिवसेनेचा उमेदवार म्हटला तर कपाळावर भगवा टिळा असे एक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र शिवसेनेचे चरगाव गणातील नागो रामा बांगारा हे उमेदवार आपल्या वैशिष्टय़पूर्ण पेहरावामुळे तिथे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. पहिली मतमोजणी चरगाव गटाची असल्याने सर्व उमेदवार मतमोजणी ठिकाणी दाखल झाले.

तिथेही बांगारा सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. अखेर काही मिनिटात निकाल जाहीर झाला आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी बांगारा यांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले. बांगारा विजयी झाल्याचे पाहून त्यांच्याबद्दलच्या उत्सुक नजरांत कौतुकाचे भावही तरळले. उमेदवार मतदारांतला आणि त्यांच्या सारखाच असला तर तो सहज विजयी होऊ शकतो, हेच जणू बांगारा यांच्या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.