ठाण्यातील ‘कॅप’ संस्थेचा उपक्रम; ४०हून अधिक नागरिकांची ‘फ्रीडम फ्राम’ला भेट
ठाणे : व्हॅलेंटाइनदिनी अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करतात. मात्र माणसाला जशा भावना असतात, तशाच प्राण्यांनाही असतात. यासाठी ठाण्यातील येऊर एन्व्हायरन्मेंट सोसायटी आणि सिटिझन फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थांच्या वतीने मुक्या प्राण्यांविषयी प्रेम व्यक्त करण्याची संधी नागरिकांना जुने वाघबीळ गाव येथे ‘फ्रीडम फार्म’च्या माध्यमातून रविवारी उपलब्ध करून दिली. या ठिकाणी चाळीसहून अधिक नागरिकांनी भेट दिली.
माणसांमध्ये प्राण्यांबद्दल करुणा वाढविण्याचे तसेच प्राण्यांविषयी माणसांचा दृष्टिकोन बदलण्याचे काम सिटिझन्स फॉर अॅनिमल प्रोटेक्शन ही संस्था सप्टेंबर २०१९ पासून करत आहे. सर्वसामान्य माणूस प्राण्यांप्रति सहानुभूतिशील, सहनशील, अहिंसक बनला पाहिजे, तसेच प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये मैत्री व्हावी या हेतूने ‘तुमच्या जोडीदाराला भेटा’ या संकल्पनेवर ‘फ्रीडम फार्म’ला भेट दिल्यानंतर कोणाला येथील प्राण्यांना स्वत: च्या घरी अथवा संस्थेमध्ये दत्तक घेण्याची व्यवस्था या कार्यक्रमात करण्यात आली होती. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेऊन सकाळी ९ ते दुपारी १२ वाजता आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजता अशा दोन गटांमध्ये प्रत्यक्ष भेट देणाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. ठाण्यासह, मुंबई, सांताक्रूझ, चेंबूर अशा विविध ठिकाणांहून नागरिकांनी या फ्रीडम फार्मला भेट दिली. व्हॅलेंटाइन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात ‘आपल्या व्हॅलेंटाइन जोडीदाराची ओळख’ तसेच ‘आपल्या व्हॅलेंटाइन जोडीदाराबरोबर सेल्फी काढणे’ असे मनोरंजनात्मक उपक्रम या दिवशी घेण्यात आले.
‘फ्रीडम फार्म’ काय आहे?
ठाण्यातील सिटिझन फॉर अॅनिमल प्रोटेक्शन आणि येऊन एन्व्हायरन्मेंट सोसायटी यांच्या वतीने शहरातील भटक्या जखमी, अशक्त आणि उपाशी प्राण्यांसाठी वाघबीळ येथे हक्काचा निवारा बांधण्यात येत असून ‘फ्रीडम फार्म’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. शहरात एखादा भटका प्राणी आढळून आल्यास त्या प्राण्यावर तात्काळ उपचार करण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांची कशा पद्धतीने निगा राखली पाहिजे याचीही माहिती या प्रकल्पात दिली जाणार आहे. सध्या या फ्रीडम फार्ममध्ये एकूण १७ प्राणी आहेत. त्यामध्ये १२ श्वान, ४ मांजरी आणि एक गाय आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:09 am