शहरातील अस्ताव्यस्त केबल तारांच्या जाळ्यावरील कारवाई वर्षभरापासून बासनात  

भाईंदर : मीरा रोड भागात अनधिकृतपणे जोडण्यात आलेल्या केबल तारांचे चक्क रस्त्यावर अतिक्रमण झाले असून त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब या तारांच्या संदर्भात एक वर्षांपूर्वी कारवाईचा ठराव महासभेत मंजूर होऊनही कारवाई अजूनही बासनात असल्याने शहरात बेकायदेशीर केबलचे जाळे उभे राहात आहे यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मीरा-भाईंदर शहरात मोठय़ा प्रमाणात उंच उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्याचबरोबर महाजालाचा वापर वाढल्याने मोठय़ा प्रमाणात ग्राहकांची संख्या वाढत आहे. यामुळे खासगी इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्यांचे मोठे पीक आले आहे. त्यात ग्राहक सतत सेवा बदलत असल्याने सतत तारा टाकल्या जातात. पण काढण्यासाठी कुणी येत नाही. तसेच उंच इमारती असल्यामुळे केबलच्या लाइन फिरवणे कठीण आणि खर्चीक असल्याने खासगी इन्टरनेट आणि डीटूएचधारकांनी आपल्या सोयीनुसार या तारा फिरवल्या आहेत.

कालांतराने पडणाऱ्या उन्हामुळे आणि वजनाने या तारा लोंबकळत रस्त्यावर काही फुटांच्या अंतरावर येऊन ठेपल्या आहेत. मागील काही वर्षांत लोकसंख्येप्रमाणे येथील केबल तारांमध्येदेखील वाढ झाली आहे. केबल तारांचे योग्य नियोजन न झाल्यामुळे संपूर्ण भागात तारांचे जाळे निर्माण झाले आहे. या तारांपैकी काही तारा चक्क रस्त्यावरून टाकण्यात आल्या आहेत.  त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अळथळा येत असून अपघाताची भीती वाढली आहे. यात प्रामुख्याने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना अधिक धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी या तर दिसत नसल्याने अनेक दुचाकीस्वार या तरांचे शिकार होत आहेत. या तारांच्या संदर्भात स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, पण अद्याप प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही.

शहरात अनधिकृत परसलेल्या या केबल तारांवर  कारवाई करण्याकरिता २०१९ रोजी  जानेवारी महिन्यात महासभेत ठराव क्रमांक-११८ पास करण्यात आला होता. परंतु यावर कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे दिवसेंदिवस शहराचे विद्रूपीकरण होत आहे. मुख्य बाब म्हणजे शहरातील अनेक राजकीय नेत्यांचा  केबल व्यवसाय असल्यामुळे कारवाई केली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रवीण परमार यांनी केला आहे.

शहरातील केबल तारांचे सर्वेक्षण करण्याकरिता एका संस्थेची समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

– सचिन पावर, कनिष्ठ अभियंता, मीरा-भाईंदर महानगरपालिका