|| प्रसेनजीत इंगळे

किराणा दुकानातून विनामूल्य वाणसामान; माणुसकीचे अभूतपूर्व दर्शन

 

विरार : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर केली असली तरी ज्यांचे हातावर पोट आहे, अशा अनेक गरिबांचे जगणे मुश्कील झाले आहे. हाताला काम नसल्याने कौटुंबिक अर्थव्यवस्थाही कोसळली आहे. गरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून वसई पूर्वेच्या चिंचोटी परिसरात एका वयोवृद्ध दाम्पत्याने माणुसकीचे अभूतपूर्व दर्शन घडवले आहे. या दाम्पत्याचे या परिसरात किराणा मालाचे दुकान आहे. हे दुकान आता त्यांनी या परिसरातील गोरगरिबांसाठी खुले केले आहे. विनामूल्य हे दाम्पत्य येथील गोरगरीब लोकांना अन्नधान्य वाटत आहे.

वसईच्या चिंचोटी परिसरात बहुतांश आदिवासी पाडे आहेत. मोलमजुरी करून हातावर पोट भरणारी शेकडो कुटुंबे या परिसरात राहतात. हाताला मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. पण सध्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी लागू असल्याने शेकडो कुटुंबांच्या हाताचे काम हिरावले आहे. यामुळे पदराची जमापुंजी मोडत पोटाची खळगी भरत आहेत. पण आता टाळेबंदीचा कालावधी त्यांच्यासाठी अधिक जीवघेणा बनत चालला आहे. कारण हातातले पैसे संपल्याने एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे. अशातच याच गावात किराणा मालाचे दुकान चालवणारे हरिश्चंद्र गुप्ता आणि त्यांच्या पत्नी आशा गुप्ता हे पुढे आले आणि या कुटुंबांच्या पोटाचा प्रश्न मार्गी लावला. हे दाम्पत्य आपल्या दुकानातील किराणा माल गोरगरिबांना मोफत देत आहे. यामुळे या परिसरातील अनेक आदिवासी कुटुंबांच्या घरांत चूल पेटत आहे.

वसईतील कोल्ही चिंचोटी येथे १९७४ मध्ये गुप्ता कुटुंबाने नारायण जनरल स्टोर्स हे किराणा मालाच दुकान सुरू केले. त्या वेळी या परिसरात काही तुरळक आदिवासी कुटुंबे पाडय़ात विखुरलेली होती. कालांतराने महामार्ग झाला. औद्योगिक वसाहती वसल्या, त्यांना लागणारा कामगार येथे आल्याने मोठय़ा प्रमाणात चाळी उभ्या राहिल्या. मुंबई, गुजरात, राजस्थान, यूपी, बिहार, दिल्ली या ठिकाणांहून हजारो कामगार भाकरीच्या लढाईसाठी या परिसरात वसले. मात्र आज करोनाच्या संकटाने बहुतेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे लोक पायी चालत जात असताना या गुप्ता कुटुंबांना दिसत आहेत. अशा कुटुंबांच्या जेवणाची व्यवस्था आणि प्रवासात पुरेल एवढा शिधा ते लोकांना विनामूल्य देत आहेत.

महाराष्ट्राने केलेल्या उपकारांची परतफेड करायची हीच वेळ असल्याचे सांगत गुप्ता कुटुंब हे दुकानावर येणाऱ्या वाटसरू तसेच गरीब गरजूंना विनामूल्य धान्यवाटप करत आहे. हे वाटप करताना सामाजिक अंतराचे भान ठेवत त्यांना पाण्याची बाटली, खाद्यपदार्थ देत आहेत. धान्यवाटप करण्यासाठी त्यांनी आणखी धान्यसाठा मागवला आहे. संकटसमयीच खरा माणुसकीचा खरा आदर्श गुप्ता यांनी घालून दिला आहे.