चार जणांना अटक

दुसऱ्यांकरवी मारहाण केल्याच्या संशयावरून चार तरुणांनी आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उजेडात आली. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेल्या या तरुणाच्या आईला खाडीकिनारी त्याची एक चप्पल सापडल्यानंतर ठाणे पोलिसांनी शिताफीने तपास करत या तरुणाच्या मारेकऱ्यांना बेडय़ा ठोकल्या. कोपरी येथील खाडीतून त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी बाहेर काढण्यात आला.

सचिन ऊर्फ बांग्या नरवडे (२८) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून तो कोपरी येथील राजनगर परिसरात राहत होता. २९ एप्रिलच्या रात्री तो मित्रांकडे जातो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या आईने सर्वत्र शोध घेतला. त्याचा कुठेच ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर १ मे रोजी त्याच्या आईने कोपरी पोलीस ठाण्यात सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. या तक्रारीनंतर कोपरी पोलिसांची पथके सचिनचा शोध घेत होती. सचिनची आईदेखील त्याचा शोध घेत होती. खाडीकिनारी सचिन अनेकदा जात असल्यामुळे तीदेखील कोपरी येथील खाडीकिनारी गेली असता बुधवारी तिला सचिनची एक चप्पल सापडली. आपल्या मुलाची चप्पल असल्याची खात्री पटल्याने तिने कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या दिवशी सचिन मित्राकडे जात असल्याचे सांगून गेला होता. त्यामुळे त्याच्या आईने या मित्रांवर संशय व्यक्त केला. त्याआधारे पोलिसांनी बुधवारी रात्री सचिनचा मित्र द्वारकानाथ ऊर्फ जयेश गावंड (२९) याच्यासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चौकशीमध्ये चौघांनी सचिनचा खून केल्याची कबुली दिली, अशी माहिती वागळे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली. गुरुवारी सकाळी पोलिसांनी दलदलीच्या भागातून सचिनचा मृतदेह शोधून काढला, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांनी दिली.

सचिन दाखलेबाज गुन्हेगार

हत्या झालेला सचिन नरवडे हा दाखलेबाज गुन्हेगार होता. त्याच्या नावावर घरफोडी, चोरी, मारामारी तसेच खंडणीचे गुन्हे दाखल होते. काही वर्षांपूर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते. तसेच आरोपी द्वारकानाथ गावंड याच्याविरोधात मारामारीचा एक गुन्हा यापूर्वी दाखल आहे.

घटनाक्रम

काही महिन्यांपूर्वी सचिन याने दुसऱ्यांकरवी आपल्याला मारहाण केल्याचा संशय द्वारकानाथ गावंड याला होता. या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याने सचिनच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार कोपरीतील जेटी बंदराजवळील खाडीकिनारी भागात द्वारकानाथ आणि त्याच्या दोन साथीदारांनी डोक्यात दगड घालून सचिनची हत्या केली. मात्र, मृतदेह सापडल्यानंतर पोलीस आपल्यापर्यंत पोहचतील, अशी भीती तिघांना होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी हे तिघे आणखी एका साथीदारासह घटनास्थळी गेले व सचिनचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून खाडीतील दलदलीमध्ये नेऊन पुरला.