कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेत दिव्यांची अमावास्या हा सण साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांनी दिव्यांचे विविध प्रकार आणि त्यांचा विविध ठिकाणी होणारा वापर समजावून सांगितला. निरंजन, समई पंचारती, कंदील, चिमणी, पणती, दगडी दिवा, दिवटी,लामण दिवा अशा विविध प्रकारच्या दिव्यांचे प्रदर्शन शाळेत मांडण्यात आले होते. नीलाक्षी दातार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष सुश्रूत वैद्य उपस्थित होते. दररोज संध्याकाळी घरी दिवा लावून शुभंकरोती म्हणण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्हावी या हेतूने गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात येतो. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमास  सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन शिक्षक सरोदे यांनी केले. शाळेला भेट दिलेल्या दानपेटीत जमा होणाऱ्या रकमेचा उपयोग आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे. बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेचे अध्यक्ष सुश्रूत वैद्य, कार्यवाह प्रसाद मराठे, मुख्याध्यापिका कल्पना पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक घाटे यांनी केले.