प्लास्टिक पिशव्या निर्मूलनासाठी विक्रेता संघटनेचा पुढाकार; कापडी पिशव्या वापरण्याचा या वर्षांपासून संकल्प
प्लॅस्टिकच्या अति वापरामुळे निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने २००६ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली. मात्र या आदेशाची कुणीही अंमलबजावणी करताना दिसत नाही. परवाच्या प्रजासत्ताक दिनापासून भाजी विक्रेता संघालाच हाताशी धरून ऊर्जा फाऊंडेशनने प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी आणून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरण्याविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
ऊर्जा फाऊंडेशन आणि भाजी विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारीपासून यासंदर्भात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर बंदी घालण्यात आली असली तरी विक्रेत्यांकडे या पिशव्या सर्रास दिसतात. सुरुवातीला विक्रेते ‘ग्राहकांना पिशवी घरून आणत जा’ असा सल्ला देत असत, परंतु त्यांनाही बाजारात या पिशव्या पुन्हा उपलब्ध झाल्याने आता पुन्हा या पिशव्या वापरण्याकडे सगळ्यांचा कल वाढला आहे. ग्राहकांना विक्रेत्यांनीच पिशवी दिली नाही तर ते नक्कीच स्वत:हून घरून कापडी किंवा कागदी पिशव्या आणण्यास सुरुवात करतील, अशी आशा बाळगून आम्ही विक्रेत्यांपासूनच या जनजागृतीची सुरुवात करत असल्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल दीक्षित यांनी सांगितले.
विक्रेत्यांना आम्ही काही कापडी पिशव्या देणार आहोत, समजा ग्राहकाकडे पिशवीच नसेल तर त्यांना कापडी पिशव्या वापरा, असे आवाहन विक्रेतेच करतील. पिशव्या अगदी कमी किमतीत उपलब्ध होतील. तसेच भाजी मंडईत जनजागृतीपर फलकही लावण्यात आले आहेत. जेणेकरून ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही विक्रेतेच आपल्या जवळचा ग्राहक जाऊ नये म्हणून तो येण्याआधीच पाव किलो, अर्धा किलोचा माल प्लास्टिकच्या पिशव्यांत बांधून ठेवतो. त्यांनाही या सवयीपासून परावृत्त करायचे आहे.
– स्नेहल दिक्षित, ऊर्जा फाऊंडेशन