आता ग्रामीण भागांतील अंध-बहुविकलांग मुलांसाठीही वर्ग चालविणार!  

अंध असलेल्या बहुविकलांग ‘विशेष’ मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन यासाठी गेल्या एक तपाहून अधिक काळ मुंबई-ठाणे परिसरात काम करीत असलेल्या ‘सोबती पालक संघटने’च्या वाडा तालुक्यातील तिळसा येथे उभारण्यात आलेल्या देखण्या आणि भव्य निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्राला गेल्या बुधवारी ‘पर्किन्स इंटरनॅशनल’ या अमेरिकी संस्थेच्या प्रतिनिधींनी भेट देऊन तेथील विविध उपक्रमांची प्रशंसा केली.

‘सोबती’च्या या केंद्रात ५० विशेष मुलांच्या (२८ मुले व २२ मुली) निवासाची सोय करण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यात १० विशेष मुले येथे सोमवार ते शुक्रवार राहतात आणि शनिवार-रविवारी घरी जातात. येत्या वर्षभराच्या काळात टप्प्याटप्प्याने विशेष मुलांची ही संख्या वाढवीत नेली जाणार आहे. त्याचबरोबर वाडा परिसरातील अशा विशेष मुलांसाठीही एक विनामूल्य वर्ग सुरू करण्याचा निर्णय ‘सोबतीने’ घेतला आहे. तसे आवाहनही तालुक्यातील संबंधित पालकांना संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

जगभरातील अंध व बहुविकलांगांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मविश्वासाने जगण्यात मोलाची मदत करणाऱ्या ‘पर्किन्स इंटरनॅशनल’च्या डेबोरा ग्लिसन, त्यांचे सहकारी मिचेल आणि भारतातील या संस्थेच्या प्रतिनिधी संपदा शेवडे व अनुराधा मुंगी यांनी या केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विशेष मुले आणि प्रशिक्षकांची संवाद साधला. या केंद्रात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. ‘आम्ही सोबती परिवाराशी संबंधित आहोतच आणि हे नाते असेच कायम राहील,’ अशी ग्वाही ‘पर्किन्स इंटरनॅशनल’च्या प्रतिनिधींनी दिली.

‘सोबती’ ही प्रामुख्याने अंध असलेल्या बहुविकलांग मुला-मुलींचे प्रशिक्षण व पुनर्वसन यासाठी पालकांनी २००४ मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. ठाणे शहरात २००७ पासून व मुंबईतील अंधेरी येथे २०१० पासून संस्थेतर्फे व्यवसाय प्रशिक्षण, फिजिओथेरेपी केंद्र असे उपक्रम राबविले जात असत. विशेष मुलांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी वाडा तालुक्यातील तिळसा येथे संस्थेने हे केंद्र उभारले आहे. त्यासाठी श्रमजीवी संघटनेचे प्रणेते व माजी आमदार विवेक पंडित यांनी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली. या केंद्रात सध्या चार शिक्षक व शिक्षिका, तसेच इतर कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मुला-मुलींची संख्या जशी वाढवीत नेली जाईल, तशी जास्त प्रशिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचीही सोय केली जाणार आहे. शिवाय काही पालकही तिथे कायम उपस्थित असतात.

‘सोबती’ची ही वास्तू प्रशस्त, मोकळी आणि हवेशीर आहे. सौरऊर्जा, पर्जन्य जलसंधारण योजना राबवून इथे पर्यावरणस्नेह जपण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरण करणारी स्वतंत्र यंत्रणा इमारतीच्या आवारात आहे. लवकरच कचरा व्यवस्थापन प्रकल्पही येथे राबविण्यात येणार आहे. इमारतीत तळमजल्यावर दोन स्वतंत्र आणि हवेशीर दालनांमध्ये विशेष मुला-मुलींची राहण्याची सोय आहे. सामाईक जेवणघरात त्यांना एकत्र नाश्ता, जेवण दिले जाते. या केंद्राच्या पहिल्या मजल्यावर व्यवस्थापक, पाहुणे, पालक आदींना राहण्यासाठी पाच स्वतंत्र कक्ष आहेत. मध्यभागी असलेल्या मोठय़ा सभागृहात या विशेष मुलांचे प्रशिक्षण वर्ग चालतात. या वर्गामध्ये मुले मोत्याचे दागिने, राख्या, शोभेचे दिवे, तोरणे, चहा मसाला, मुखवास आदी प्रकारच्या उपयोगी आणि शोभेच्या वस्तू बनवितात. आगामी काळात इतरही काही कलांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था संस्था करणार आहे.

कार्यशाळा, शिबिरे

सध्या प्रत्येक मुलाच्या पालकांकडून दरमहा फक्त पाच हजार रुपये शुल्क आकारले जाते. वेतन, राहण्या-जेवणाचा खर्च, देखभाल इत्यादीसाठी दरमहा संस्थेला दीड ते पावणे दोन लाख रुपये लागतात. विविध व्यक्ती, संस्था आणि कंपन्या यांनी दिलेल्या देणग्यांमधून ‘सोबती’ जमाखर्चाची तोंडमिळवणी करते, अशी माहिती संस्थेचे खजिनदार श्याम गोखले यांनी दिली. दर आठवडय़ात शुक्रवारी संध्याकाळी मुले घरी येतात. त्यामुळे शनिवार-रविवारी ‘सोबती’ची ही वास्तू कार्यशाळा, शिबिरे आणि सभा-बैठकां यांसाठी संस्थांना उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे संस्थेचे सरचिटणीस प्रकाश बाळ यांनी सांगितले.