भिवंडीतून एकास अटक; पाच-सहा वर्षांपासून व्यवसाय

ठाणे : भिवंडी येथील वापरलेल्या मास्कची पुनर्विक्री करण्याच्या प्रकरणात नारपोली पोलिसांनी इमरान शेख (२२) याला अटक केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून इमरान हे वापरलेले मास्क काहीजणांना विकत असल्याचे तपासात समोर आले आहे. प्रत्येक मास्कमागे इमरान याला एक रुपयाचा नफा मिळत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हे मास्क तो कुठून आणत होता आणि कोणाला विकत होता, या दिशेने तपासाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

करोना विषाणूंची लागण होऊ नये यासाठी अनेकजण मास्कचा वापर करत असतानाच विदेशात वापरलेल्या मास्कची धुऊन विक्री केली जात असल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. ही चित्रफीत भिवंडीतील दापोडा भागातील होती. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना येथील मास्क वापरलेले आहेत की नाही हे तपासणी करण्यासाठीचे एक पत्र पाठविले होते. त्यानंतर रविवारी पोलिसांना काल्हेर भागातील जलवाहिनीजवळ मोठय़ा प्रमाणात वापरलेले मास्क आढळून आले होते. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मास्कचे नमुने गोळा केले होते. त्यानंतर येथील ग्रामसेवक अमोल कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नारपोली पोलिसांनी या प्रकरणात इमरान शेख नावाच्या व्यक्तीला नारपोली भागातून अटक केल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त एन. सी. कौसडीकर यांनी दिली.

इमरान शेख हा गेल्या पाच वर्षांपासून वापरलेले मास्क काहीजणांना बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये विकत होता. यातील प्रत्येक मास्कच्या बदल्यात त्याला एक रुपया नफा मिळत होता. या प्रकरणी पोलिसांनी आता इमरानने हे मास्क कुठून आणले होते आणि ते कोणाला विकणार होते, याचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता पोलीस वर्तवीत आहेत.