लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : तंत्रज्ञानाचा माणसाच्या जीवनावर खूप मोठा परिणाम झाला आहे. या माध्यमातून विविध गोष्टी व्यापक पद्धतीने करता येतात. मात्र, याच तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त व्यासपीठ म्हणून कसा करता येईल, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

विश्व मराठी परिषदेतर्फे पहिले विश्व मराठी ऑनलाइन संमेलन २८ जानेवरी ते ३१ जानेवारी या कालावधीत होणार असून या ऑनलाईन संमेलनाचे डॉ. अनिल काकोडकर हे पहिले अध्यक्ष आहेत. या विश्व मराठी ऑनलाइन संमेलनाविषयी जाणून घेण्यासाठी ठाण्यातील मराठी ग्रथ संग्रहालायाच्या वतीने एक कार्यक्रम घेण्यात आला. हा मुलाखतीचा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ‘फेसबुक पेज’वर पार पडला.

या वेळी विश्व मराठी परिषदेचे संस्थापक प्रा. क्षितीज पाटुकले हे उपस्थित होते.

विश्व मराठी ऑनलाईन संमेलनाचा मराठी माणसांच्या दृष्टीने विचार केला तर, या व्यासपीठांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी विविध संधी उपलब्ध होतील, असे काकोडकर म्हणाले. तंत्रज्ञान हे झपाटय़ाने पुढे जात आहे. त्यामुळे तंत्रज्ञानात होत असलेले बदल वेळीच आत्मसात करणे गरजेचे आहे. जो समाज तंत्रज्ञानाचा वापर न करता अजूनही भूतकाळात रमत आहे, त्या समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असे सांगतानाच कोणतेही सामाजिक काम हे एका परिसरापुरतेच मर्यादित न राहता ते व्यापक होणे गरजेचे असते. त्यामुळे सामाजिक उद्दिष्टांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे झाल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.