News Flash

शाळेच्या बाकावरून : पाणी आणि वाणी जपून वापरा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या मोठय़ा मैदानात जलप्रतिज्ञा घेतली

पाणी आणि वाणी जपून वापरा वाणीमुळे तुमचा वर्तमानकाळ आणि पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे
आपल्या संतमहात्म्यांनी अगदी सोप्या भाषेत जीवन कसे जगावे याचे उत्तम मार्गदर्शन केले आहे आणि त्यासाठी अगदी सरळसोपा मार्ग सांगितला आहे. संत तुकाराम महाराजांनीदेखील पाणी, वाणी, नाणी नासू नये असे सांगितले आहे. पाणी हेच जीवन असं माहीत असूनही आपलं जीवन अधिकाधिक सुखकर करताना आपण निसर्गाचे अपरिमित नुकसान केले. आणि त्यामुळेच आज आपण अनेकविध स्वरूपाच्या गंभीर समस्यांना सामोरे जात आहोत. सध्या राज्यासमोर भीषण दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई या गंभीर समस्या आहेत.
या पाश्र्वभूमीवर शालेय विद्यार्थी जलसाक्षर करण्याच्या व्यापक हेतूने १६ ते २२ मार्च या कालावधीमध्ये जलजागृती सप्ताहदिनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना निसर्गजतन, संवर्धन करण्याचे महत्त्व त्यांच्या जडणघडणीच्या काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून, प्रत्यक्ष कृतीशील सहभागातून पटवून द्यायला हवे. कारण ती भविष्याची निकड आहे. पर्यावरणसाक्षर पिढी तयार होणे ही खरोखरच देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.
कल्याणमधील न्यू श्री वाणी विद्याशाळा हायस्कूल शाळेत या सप्ताहाच्या निमित्ताने पाणी, पाण्याचे सजीवांच्या दृष्टीने महत्त्व, पाणी बचतीची निकड या दृष्टीने विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. पाणीबचत (सेव्हवॉटर) या विषयावर इ.५वी ते ९वीसाठी चित्रकला स्पर्धा आणि मराठी/इंग्रजी भाषेत निबंध स्पर्धाही घेण्यात आली. पाणी/ पाणी बचत या विषयांवर निवडक विद्यार्थ्यांनी आपले विचारही मांडले. सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, नो वॉटर नो लाईफ, वॉटर एज ए फ्रेंड ऑफ लिव्हिंग थिंग्ज अशी घोषवाक्ये लिहिलेले फलक विद्यार्थ्यांनी तयार केले. शाळेजवळील परिसरात हे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली.
डोंबिवली येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीचे चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक विभागात जलसप्ताहाच्या निमित्ताने अनेक उपक्रम राबवण्यात आले. माध्यमिक विभागाने विद्यार्थी आणि परिसरातील लोकांमध्ये पाण्याचे महत्त्व आणि पाणी बचतीची निकड याविषयी त्यांचे महत्त्व पटवून देऊन जागृती निर्माणाचा प्रयत्न केला.
होळी सणाच्या पाश्र्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळून रंगपंचमीचा सण साजरा होणे खरतर अधिक उचित होते. ‘पाण्याचा अपव्यय आणि गैरवापर करणार नाही, पाण्याचे जतन संवर्धन करण्याचा प्रयत्न करेन’, अशी प्रतिज्ञा या शाळेतील विद्यार्थ्यांनीही घेतली. पाणी आणि रंगाशिवाय सण साजरा करण्याचा अधिक व्यापक विचार मुख्या. रजनी म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांमध्ये रुजवण्याचा हा अत्यंत स्तुत्य प्रयत्न होता.
ठाण्यातील लोकमान्यनगर येथील आर. एस. देवकर इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या मोठय़ा मैदानात जलप्रतिज्ञा घेतली. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाणी बचतीचा संदेश देणारे स्टीकर्स विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले होते. पाणीबचत, पाण्याचा अपव्यय टाळण्याची निकड याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. वक्तृत्त्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आली.
लोकमान्यनगर येथील राजा शिवाजी विद्यालय या मराठी शाळेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक विभागात या सप्ताहाच्या निमित्ताने पाण्याचे जलस्रोत, महत्त्व , उपयोग आणि पाण्याचे नियोजन या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजिण्यात आल्या होत्या.
ठाण्यातील सावरकर नगर येथील श्रीराम विद्यामंदिर शाळेमध्ये १६ मार्च रोजी पाण्याचे महत्त्व आणि पाणी बचत या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग इ. मुद्यांवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि चर्चाही करण्यात आली. या सप्ताहाच्या निमित्ताने घोषवाक्य स्पर्धा आयोजिण्यात आली होती. श्रीराम विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली आणि जनजागृती फेरीही काढली.
नालंदा पब्लिक स्कूल या शाळेमध्ये नेचर क्लबच्या वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून निसर्गाचे महत्त्व पटवून देताना निसर्गाशी जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सातत्याने केला जातो. दरवर्षी शाळा या दृष्टीने त्या त्या वर्षांचे उद्दिष्ट ठरवते आणि ते साध्य करण्याच्या दिशेने विविध छोटे-मोठे उपक्रम वर्षभर सर्व इयत्तांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाला धरून राबवले जातात. या शाळेत पाण्याचे महत्त्व या वयोगटापासूनच पटवून दिले जाते. गेली ४ ते ५ वर्षे शाळेमध्ये दोन पिंपे ठेवली आहेत आणि सर्व विद्यार्थी आपापल्या बाटलीमधील पाणी घरी जाताना या पिंपामध्ये टाकतात. हे पाणी शाळेतील भाज्यांच्या बगीच्याला घातले जाते. ओल्या कचऱ्यापासून तयार झालेले खत आणि हे पाणी यापासून पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने या बगीच्यातील भाज्या तयार होतात. विशेष म्हणजे शाळेतल्या कँटीनसाठी भेंडी, वांगी, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, मेथी, पालक या बगीच्यातल्याच भाज्या वापरल्या जातात. गेल्या वर्षी वेस्ट मॅनेजमेंट या विषयाला प्राधान्य देणाऱ्या अनेकविध अ‍ॅक्टिव्हीज/ उपक्रम राबवण्यात आले. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून, त्या दृष्टीने काम सुरू आहे. अशा तऱ्हेने जाणीवपूर्वक प्रयत्न स्वत:पासून सुरू करून विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेणाऱ्या नालंदा शाळा, मुख्याध्यापिका नंदिता खन्ना मॅडम, जयश्री पिल्लर्ड मॅडम आणि इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वाचेच मनापासून अभिनंदन करायला हवे. अशा प्रयत्नांमधून विद्यार्थ्यांना निसर्ग आणि निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व जाणवणार आहे. आणि आपल्याला निसर्गाबरोबर जायचे आहे. कारण त्याच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व अवलंबून आहे हेही त्यांना पटणार आहे. जडणघडणीच्या वयात असे पर्यावरण जतन संवर्धनाचे केलेले संस्कार कायमस्वरूपी परिणाम करणारे असतात. अशा तऱ्हेची पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणारी भावी पिढी तयार होणे ही खरोखरच आपल्याच नव्हे तर प्रत्येक देशाची गरज आहे. सर्व शाळा आपापल्या परीने विद्यार्थ्यांवर पर्यावरणजतन संवर्धनाचे संस्कार करू पाहात आहेत, पण साऱ्या समाजाने या कार्यात हातभार लावण्याची निकड आहे.
महात्मा गांधीजी म्हणाले होते ”The earth, the air, the land, the water are not aninheritance from our forefather but on a loan from our children. so we have to handover to us.” खरे तर आपण सर्वानी पर्यावरणसाक्षर, जलसाक्षर होण्याची त्यासाठी खारीचा हातभार लावण्याची गरज आहे. कारण ती आपल्याच मुलाबाळांच्या भविष्याची निकड आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 2:20 am

Web Title: use water with care campaign by sri vani vidyashala high school kalyan
Next Stories
1 निमित्त : धर्मादाय नेत्रचिकित्सा चळवळीची पंचविशी
2 वसई-विरार पालिकेची आर्थिक बेशिस्त उघड
3 कर्मचाऱ्यांअभावी मीरा-भाईंदरमधील अग्निशमन केंद्रे रखडली
Just Now!
X