तो बनारसहून मुंबईला आला, एका व्यक्तीची हत्या करण्यासाठी. ज्या कुणाची हत्या तो करणार होता, त्याला तो ओळखत नव्हता, तरीही त्याने या निरपराध व्यक्तीची हत्या केली. ही हत्या केल्यानंतर त्याचा एक विकृत कट सफल होणार होता. मात्र हा कट वालीव पोलिसांनी उधळून लावला.

१० फेब्रुवारी २०१८. नायगाव रेल्वे स्थानकाजवळच्या एका निर्जन पडीक जागेत पोलिसांना एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला. त्याची १७ ते १८ वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्याची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी पंचनामा सुरू केला आणि त्यांना लगेच मारेकऱ्याचा सुगावा मिळाला. मारेकऱ्याचं पाकीट झटापटीत खाली पडलं होतं. त्यात विनयकुमार नावाच्या व्यक्तीचं छायाचित्र, पत्ता आणि मोबाइल क्रमांक होता. शिवाय मृत तरुणाच्या हातात एक कीचेन होती. त्यावर विनयकुमार असं नाव लिहिलेलं होतं. ही कीचेन त्या मारेकऱ्याचीच होती. या पुराव्यावरून विनयकुमार यादव नावाच्या व्यक्तीनेच या अज्ञात तरुणाची हत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. आयताच दूरध्वनी क्रमांक आणि पत्ता सापडल्याने पोलिसांचं काम सोप्पं झालं होतं. मृताची ओळख पटलेली नसली तरी मारेकऱ्याची ओळख पटली होती. पोलिसांनी अवघ्या दीड तासात सापडलेल्या पत्त्यावरून नायगाव पूर्वेच्या बापाणे येथून विनयकुमार यादव (३२) या संशयित मारेकऱ्याला शोधून काढलं. एका हत्या प्रकरणाचा दोन तासांत उलगडा झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आता फक्त विनयकुमारने हत्या का केली हेच जाणून घ्यायचं होतं.

वालीव पोलीस ठाण्याच्या प्रकटीकरण शाखेच्या कक्षात पोलिसांनी विनयकुमारची चौकशी सुरू केली. ‘मी हत्या केली नाही’, ‘मी या व्यक्तीला ओळखत नाही’ असंच तो सांगत होता. अर्थात सुरुवातीला प्रत्येक जण असंच सांगत असतो. त्यामुळे पोलिसांना ते नवीन नव्हतं. विनयकुमार हा पत्नी शिखासह (२३) काही महिन्यांपासून नायगाव पूर्वेच्या बापाणे येथील एका चाळीत राहत होता. तो खासगी टॅक्सीचा चालक होता. त्यांचा बऱ्यापैकी संसार सुरू होता. मग त्याने या तरुणाची हत्या का केली याचा उलगडा होत नव्हता. पोलिसांनी विनयकुमारला बोलतं करायचा खूप प्रयत्न केला. पण तो काही दाद देत नव्हता. शेवटी पोलिसांचा विनयकुमारवर विश्वास बसला की तो खरं बोलतोय. मग या मारेकऱ्याकडे विनयकुमारचं पाकीट, कीचेन कशी मिळाली? पाकिटात विनयकुमारचं छायाचित्र, त्याच्या जुन्या कंपनीची चावी, असं साहित्य होतं. कीचेनही त्याच्या नावाची होती. विनयकुमारने सांगितलं, मी आजवर कधीच नावाची कीचेन बनवली नव्हती. विनयकुमार खोटं बोलत नव्हता, पण पुरावे त्याचा विरोधात होते. यामुळे पोलीस चक्रावले होते. आता या प्रकरणाने पोलिसांपुढे आव्हान निर्माण केलं होतं. हे काय गौडबंगाल होतं. ज्याची हत्या झाली, त्याचाही काहीच थांगपत्ता लागत नव्हता.

वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी मग तपासाची दिशा बदलली. त्यांनी विनयकुमारच्या खासगी आयुष्याच्या पूर्वार्धाचा काही सुगावा लागतो का ते शोधण्याचा प्रयत्न केला. विनयकुमार याचं यापूर्वी लग्न झालं होतं आणि त्याला चार मुलं होती. त्याचा उत्तर प्रदेशातील बनारस येथे अ‍ॅक्वा प्लांट होता. त्याच्या कंपनीत शिखा श्रीवास्तव (२२) आणि रिंकू श्रीवास्तव हे पती-पत्नी काम करायचे. विनयकुमार आणि सुंदर दिसणाऱ्या शिखाचं सूत जुळलं. दोघांनी आपापल्या पती आणि पत्नीला सोडलं आणि मुंबई गाठली. विनयकुमारने रिंकूची पत्नी शिखाला पळवलं होतं. त्यामुळे रिंकू जर संतापला असेल, तर तो विनयकुमारची हत्या करेल. पण त्याने विनयकुमारला काहीच केलं नव्हतं की धमकीही दिली नव्हती. मग ही हत्या कुणाची झाली आणि त्या मृतदेहावर विनयकुमारचा संबंध जोडणारे पुरावे कसे सापडले? हे सारंच गूढ होतं. याचं उत्तर रिंकू श्रीवास्तवच देऊ  शकणार होता. पोलिसांनी रिंकूवर लक्ष केंद्रित केलं. तो सापडत नव्हता. त्याच्या गावीही नव्हता. पोलिसांनी मग वेगवेगळी पथकं बनवत गुजरात, बनारस असा प्रवास करत त्याला शोधून काढलं.

रिंकूने जे सांगितलं, ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. रिंकूने ज्याची हत्या केली, त्यालाही तो ओळखत नव्हता. तो एक मोहरा होता विनयकुमारचा बदला घेण्यासाठी. विनयकुमारने शिखाला पळवून आणलं होतं. त्याचा बदला घेण्यासाठी रिंकूने विनयकुमारला हत्येच्या प्रकरणात अडकवण्याचं ठरवलं. हत्येच्या गुन्ह्याात अडकवलं तर विनयकुमार तुरुंगात जाईल आणि शिखा पुन्हा माझी होईल, असं त्याला वाटलं. यासाठी त्याला एक हत्या करायची होती. आणि त्यासाठी त्याला एक मोहरा हवा होता. हत्या करण्यासाठी तो मुंबईला आला. मुंबईच्या गर्दीतून एक व्यक्ती तरी मिळेल की ज्याची हत्या करू शकू आणि त्याचा आळ विनयकुमारवर टाकता येईल, अशी त्याची योजना होती. रिंकू गुजरातच्या वापी येथे आला. तेथून तो सावज शोधायला मुंबईला यायचा. विरार रेल्वे स्थानकात त्याला पांडू नावाच्या एका किरकोळ कामं करणारा हमाल भेटला. तो एकटा होता. त्याला कुटुंब नव्हतं. हेच ते सावज, असं रिंकूने ठरवलं. त्याच्याशी त्याने मैत्री केली. दोन-चार दिवस त्याला भेटत राहिला. एकदा कामाचं आश्वासन देऊन त्याला नायगाव येथे नेलं. या काळात रिंकूने विनयकुमारच्या नावाची कीचेन बनवली. त्याच्या कंपनीची चावी आणि छायाचित्र होतं. ते एका पाकिटात टाकलं. पांडूला दारू पाजून त्याची हत्या केली आणि या वस्तू त्याच्या हातात ठेवल्या. जेणेकरून पोलीस हत्येच्या आरोपावरून विनयकुमारला पकडतील आणि झालंही तसंच.

मात्र पोलिसांनी विनयकुमारला थेट अटक न करता या प्रकरणाचा खोलवर तपास केला आणि रिंकू गजाआड झाला. मात्र रिंकू आणि विनयकुमारच्या वैयक्तिक वादात पांडू नावाच्या एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला.

सुहास बिऱ्हाडे

suhas.birhade@expressiindia.com

@Suhas_news