04 March 2021

News Flash

मुंबईच्या प्रवेशद्वारावर टोल भरणे आता सोपे!

राज्य रस्ते विकास महामंडळाकडून व्ही-टोल अ‍ॅप कार्यान्वित

राज्य रस्ते विकास महामंडळाकडून व्ही-टोल अ‍ॅप कार्यान्वित
टोल भरण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून व्ही-टोल या अ‍ॅपची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ जूनपासून हे अ‍ॅप मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवर टोल भरण्यासाठी कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे टोल भरण्यासाठी टोलनाक्यावर लागणारा वेळ वाचवणे शक्य होणार आहे. मुलुंड, एलबीएस रोड, ऐरोली, वाशी आणि दहिसर या भागांत या अ‍ॅपद्वारे टोल भरता येणार आहे, अशी माहिती व्ही टोल अ‍ॅपचा निर्माता तपन काणे याने दिली.
टोलभरणा करण्यासाठी नाक्यांवर वाहतूक धिमी होऊन वाहतूक खोळंबा वाढत असतो. हे टाळण्यासाठी मुंबईतील तपन काणे या तरुणाने स्मार्ट फोनद्वारे टोल भरण्यास मदत करणारे विशेष अ‍ॅप विकसित केले होते. याची उपयुक्तता लक्षात घेऊन मुंबईच्या सागरी सेतूवर त्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली होती. वाहनचालकाने टोलनाक्यापासून एक किलोमीटरवर हे अ‍ॅप सुरू केले की, चालकाच्या खात्यातून आपोआप पैसे कापले जाऊन टोलभरणा केंद्रावरील मॉनिटरवर त्या वाहनाचा क्रमांक आणि पैसे भरल्याचा तपशील संबंधित कर्मचाऱ्याला दिसतो. वाहन टोलनाक्यापूर्वीच ही प्रक्रिया घडते त्यामुळे वाहनचालकांना टोलनाक्यावर थांबण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे टोल भरण्यासाठी लागणारा वेळ वाचून त्यांचा प्रवास गतिमान होत आहे. तपनने या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी ‘व्हच्र्युअल टोल सिस्टीम’ (व्ही टोल) या कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून त्याने ही यंत्रणा मुंबई शहरातील वेगवेगळ्या प्रवेशद्वाराच्या टोलनाक्यांवर वापरण्यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाकडे विनंती केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता डी. ए. साळुंखे यांनी तपनला ही यंत्रणा राबवण्यास सहमती दिली आहे.

व्ही टोल संकलन यंत्रणा..
मुंबईमध्ये ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वाहनचालकांना या अ‍ॅपचा वापर करता येणार आहे. २५ जूनपासून हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून पुढील दोन महिने प्रायोगिक तत्त्वावर हा अ‍ॅप कार्यान्वित करण्यात येणार आहे. चालकाच्या बँक खात्यातून हा टोल स्वयंचलित पद्धतीने भरला जाणार आहे. किंवा व्ही-टोलच्या स्टॉल्सवरूनही या साठीचे रीचार्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अ‍ॅपची महती..
* गुगल प्ले स्टोअरमध्ये ‘व्ही टोल’ नावाने हे अ‍ॅप्लिकेशन सध्या उपलब्ध आहे. कोणत्याही स्मार्ट फोनमध्ये ते डाऊनलोड करता येते
* या अ‍ॅपमध्ये वाहनधारकाने त्याचे नाव, ई-मेल, वाहन क्रमांक, वाहनाचा प्रकार, मोबाइल क्रमांक हे तपशील नोंदवायचे आहेत
* इंटरनेट बँकिंगद्वारे टोलचे पैसे अदा करण्याची व्यवस्था या प्रणालीत आहे
* अ‍ॅप रिचार्ज करण्यासाठी स्वतंत्र स्टॉल्सची उभारणी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 12:19 am

Web Title: v toll app for paying toll
Next Stories
1 जप्त वाहन सोडविण्यासाठी धावताना एकाचा मृत्यू
2 सोसायटीचा मनमानी कारभार अंगलट
3 ठाण्यात दोन दिवस पाणी नाही
Just Now!
X