अतिदक्षता विभागात १०० हून अधिक खाटा उपलब्ध

ठाणे : करोनाचा फैलाव होऊ लागल्यानंतर रुग्णालयांतील खाटा अपुऱ्या पडू लागलेल्या  ठाण्यात आता अनेक खाटा रिकाम्या आहेत. गेल्या महिनाभरापासून रुग्णसंख्येत होत असलेली घट आणि रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण यामुळे अतिदक्षता विभागातील खाटा रिकाम्या राहण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. शहरातील विविध खासगी रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात सध्या १०० हून अधिक खाटा रिकाम्या आहेत.

महापालिका प्रशासनाने शहरातील २० हून अधिक खासगी रुग्णालये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ताब्यात घेतली होती. जून महिन्यामध्ये महापालिका क्षेत्रात करोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागला. त्यामुळे दिवसाला ४०० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. यामध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे अशा रुग्णांना अलगीकरण कक्षात अथवा रुग्णालयांमध्ये दाखल करण्याशिवाय पर्याय नसायचा. त्यामुळे महापालिकेने ताब्यात घेतलेल्या रुग्णालयांच्या खाटा कमी पडू लागल्या होत्या. अतिदक्षता खाटा कमी पडू लागल्याने गंभीर रुग्णांना उपचारासाठी शहराबाहेर जावे लागत होते.   शहरातील करोना रुग्ण शोध मोहिम वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील संसर्ग नियंत्रणात येऊ लागला आहे. सध्या दररोज सरासरी २०० ते २५० रग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर योग्यवेळी रुग्णांवर उपचार होत असल्यामुळे शहरातील करोना रुग्ण बरे होण्याचा टक्काही वधारलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील करोनाची लागण झालेल्या २२ हजार ३३२ रुग्णांपैकी १९ हजार १५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २ हजार ६१३ रुग्ण सक्रीय करोना रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत असून यातील बहुतांश रुग्णांना करोनाची सौम्य लक्षणे आहेत. रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे शहरातील बहुतांश करोना रुग्णालयांमध्ये असणाऱ्या अतिदक्षता विभागात सध्या १०४ खाटा रिकाम्या असून प्रकृती गंभीर असणाऱ्या रुग्णांना त्या सहज उपलब्ध होत आहेत. रुग्ण बरे होण्याचा टक्क वधारल्याने आणि नविन रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेचा ताणही कमी झाला आहे.

ठाणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणताही रुग्ण उपचाराविना रहाता कामा नये अशा स्पष्ट सूचना पहिल्या दिवसापासून देण्यात आल्या होत्या. असे असले तरी अतिदक्षता विभागातील खाटांची कमतरता हा प्रश्न कायम होता. गेल्या काही दिवसांपासून ही व्यवस्थाही सक्षम करण्यात आली असून रुग्ण बरे होत असल्याने खाटा रिकाम्या रहाण्याचे प्रमाण वाढले आहे.

डॉ.विपीन शर्मा आयुक्त ठाणे महापालिका