दहा हजारांहून अधिक नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण; खासगी रुग्णालयांतील सशुल्क लसीकरणाचा आधार

ठाणे : जिल्ह्य़ातील महापालिका तसेच जिल्हा परिषदेमार्फत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण राज्य शासनाच्या आदेशानुसार बंद असले तरी खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून या वयोगटाचे सशुल्क लसीकरण वेगाने सुरू आहे. या वयोगटातील २ लाख २२ हजार ३४६ नागरिकांचे आतापर्यंत खासगी रुग्णालयांनी लसीकरण केले असून त्यामध्ये १० हजार ६७८ नागरिकांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार मे महिन्यात राज्यामध्ये १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे अवघ्या १० ते १२ दिवसांतच या वयोगटाचे लसीकरण थांबविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. तेव्हापासून पालिका तसेच जिल्हा परिषदेच्या लसीकरण केंद्रांवर या वयोगटाचे लसीकरण बंद आहे. जिल्ह्य़ातील खासगी रुग्णालयांमार्फत मात्र या वयोगटाचे ऑनलाइन नोंदणीद्वारे सशुल्क लसीकरण सुरू आहे. याशिवाय, विविध संस्था आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने खासगी रुग्णालये गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहीम राबवीत आहेत. तसेच शहरात विविध ठिकाणी लसीकरण शिबिरेही आयोजित केली जात आहेत. या सर्वच ठिकाणी लसीकरणासाठी खासगी रुग्णालये शुल्क आकारत असले तरी त्यास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.  काही आस्थापना आणि कंपन्यांनी खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू केले आहे. अशा प्रकारे खासगी रुग्णालयांमार्फत आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील २ लाख २२ हजार ३४६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शिक्षण वा नोकरीनिमित्त परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांना शासकीय लसीकरण केंद्रांवर लस दिली जात आहे. त्या ठिकाणीही लसीकरणासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्य़ातील ठाणे महापालिका क्षेत्रात सात, मीरा-भाईंदर क्षेत्रात तीन आणि नवी मुंबईत सर्वाधिक म्हणजेच १७ खासगी लसीकरण केंद्रे आहेत. या केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांसह १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण करण्यात येत आहे. तर कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि ठाणे ग्रामीणमध्ये या वयोगटासाठी एकही लसीकरण केंद्र सुरू नाही, अशी माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.