कल्याणमधील केंद्रासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

कल्याण : कल्याण पश्चिमेतील लालचौकी येथील आर्ट गॅलरी केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण केले जात आहे. या केंद्रावर लाभार्थीला करोना लस देण्यापूर्वी त्याची प्रतिजन चाचणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. एकाच ठिकाणी लसीकरणानिमित्त रहिवासी अधिक संख्येने एकत्र येत असल्याने त्यांची प्रतिजन चाचणी करूनच त्यांना लसीकरणासाठी पुढे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्य़ात हे पहिलेच लसीकरण केंद्र असे आहे जेथे चाचणीचा प्रयोग राबविला जात आहे.

१८ ते ४४ वयोगटातील लस लाभार्थीनी कोविन उपयोजन, शासनाच्या उपयोजनवर ऑनलाइन नोंदणी करायची आहे. या ठिकाणाहून तारीख, वेळ, लस केंद्राचा लघुसंदेश भ्रमणध्वनीवर आल्यानंतर लाभार्थ्यांने त्याला दिलेल्या केंद्रावर लस घेण्यासाठी जायचे आहे. ऑनलाइन नोंदणीतून आपले नोंदणीकरण व्हावे म्हणून अनेक रहिवासी पहाटे चार ते रात्री दोन वाजेपर्यंत घरातील लॅपटॉप, भ्रमणध्वनीवर नोंदणीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महापालिका हद्दीत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणासाठी कल्याणमधील लालचौकी भागात एकमेव केंद्र ठरविण्यात आले आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार ४५ वयोगटापुढील नागरिकांना लसीकरणात प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी लालचौकी भागात अजूनही १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण काही प्रमाणात सुरू आहे. या ठिकाणी दररोज मोठय़ा संख्येने नागरिक जमतात. ही गर्दी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाची कसरत होत असली तरी एकाच ठिकाणी इतके रहिवासी एकत्र मिळत असल्याने प्रशासनाने त्यांची प्रतिजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यावरच पुढील लसीकरण केले जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.