ठाणे : ठाणे कारागृह प्रशासनाने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मदतीने कैद्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. कारागृहात ४५ वर्षांपुढील २०० कैदी असून दररोज २० कैद्यांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण केले जात असल्याचे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले. कारागृह अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये या कैद्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले जात आहे. लसीकरण झाल्यानंतर पुन्हा या कैद्यांची रवानगी कारागृहात केली जात आहे.

कारागृहातील अपुऱ्या जागेमुळे कैद्यांमध्ये करोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या कैद्यांना करोनाप्रतिबंधक लस उपलब्ध करून देणे गरजेचे होते. केंद्र सरकारच्या घोषणेनुसार गुरुवारपासून ४५ वर्षीय व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे ठाणे कारागृहातील ४५ वर्षांपुढील कैद्यांचेही लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. कारागृहात ४५ वर्षांपुढील २०० कैदी असून  दररोज २० कैद्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरणासाठी नेले जात आहे. या कैद्यांना लसीकरणासाठी आणताना कारागृहातील सहा ते सात अधिकारी आणि कर्मचारीही सोबत असतात. रुग्णालयात या कैद्यांना लस दिली जाते. लस दिल्यानंतर पुन्हा कैद्यांना कारागृहात नेले जाते. येत्या १० दिवसांत या कैद्यांचे लसीकरण पूर्ण होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.