ठाणे महापालिकेची मोहीम वादात; चौकशीची मागणी

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये महिनाभरापासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण स्थगित असतानाही, पालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रांवर अभिनेत्री मीरा चोप्रा हिने लशीची पहिली मात्रा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या करोना रुग्णालयामध्ये पर्यवेक्षक असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून तिचे लसीकरण करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे महापालिकेची लसीकरण मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची तसेच ओळखपत्र बनवून देणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये लशींच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम रडतखडत सुरू आहे. पालिका केंद्रांवर केवळ ४५ पुढील व्यक्तींना तसेच आरोग्य सेवकांना लस दिली जात आहे. १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण पालिकेने गेल्या महिनाभरापासून बंद ठेवले आहे. शहरातील तरुणाई लसीकरणाच्या प्रतीक्षेत असतानाच, महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर अभिनेत्री मीरा चोप्रा हिला शुक्रवारी लशीचा पहिला डोस देण्यात आल्याची बाब समोर आली. याबाबत तिने स्वत: समाजमाध्यमांवर माहिती देत लसीकरण करतानाची छायाचित्रे टाकली. भाजपने याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.  सर्वसामान्यांना एक न्याय आणि वलयांकित व्यक्तींना वेगळा न्याय का, असा प्रशद्ब्रा भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुम्बरे यांनी उपस्थित केला आहे.

या संपूर्ण प्रकाराची माहिती घेण्यात येत आहे. सर्व माहिती हाती आल्यानंतर आयुक्तांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.     -संदीप माळवी,  उपायुक्त, ठाणे महापालिका